माधवराव बागल यांनी काँग्रेसच्या वरील सभेत शेतक-यांचा आवाज उठवून त्यांचे प्रश्न मांडले. ‘पिळल्या जाणा-या शेतकरी समाजाचे जे प्रश्न होते. ते या राजकीय व्यासपीठावर मांडण्याच्या कामात माधवराव व पर्यायाने आम्हीही यशस्वी झालो’ (पृ. १०४). चव्हाण आनंदाने हे वाचकांना सांगतात.
राजकीय परिषदेत शेतक-यांचे म्हणजे ग्रामीण जनेतेचे प्रश्न मांडले गेले. यामुळे उच्चभ्रू व शहरी पुढारी नाराज झाले! पण माधवरावांच्या मताशी यशवंतराव सहमत झाले. चव्हाण लिहितात:- “स्वराज्याच्या चळवळीला काही अर्थप्राप्त करून द्यायचा असेल, तर सामाजिक आणि आर्थिक प्रश्न यांना स्पर्श केल्याशिवाय आपली स्वतांत्र्याची चळवळ पुढेच जाऊ शकणार नाही; असे माझे मत झाले होते” (पृ. १०४). ‘माझ्या राजकीय आयुष्यातील एक उत्तम धडा मी शिकलो’ चव्हाणांतील हा दुसरा बदल होय.
म. जोतिबा फुल्यांची पुन: आठवण
म. फुल्यांची आठवण चव्हांणांना झाली व पुढे ते म्हणाले :- “लहानपणी वाचलेल जोतिबा फुल्यांचे चरित्र आठवले आणि माझ्या बंधूंनी मला सांगितल्याचे स्मरले की:-
“तुम्ही विचरता, शेतकरी समाज चळवळीत सामील का होत नाही, पण तुम्ही शेतकरी समाजापुढील प्रश्नांचा कधी विचार केला आहे का?” (पृ. १०४). मसूरच्या राजकीय परिषदेने चव्हाण खूप शहाणे झाले. ‘गरिबांचे कैवारी कोण’ आणि विरोधी कोण, हे लक्षात घेऊन स्वातंत्र्याची चळवळ चालविली पाहिजे असा विचार चव्हाणांना प्राप्त झाला.
मात्र माधवराव बागल व यशवंतराव चव्हाण यांचे पिंड वेगळे होते. बागल हे या काळात सत्यशोधक विचाराला समाजवाद जोडीत होते. पुढे चव्हाण हे येरवडा तुरूंगात समाजवादाशी परिचित झाले; माधवराव बागल कडवे सत्यशोधक होते व आहेत.
भाई बागल सत्यशोधक होते, हे दुर्दैव कसे? सुदैवच होय!
चव्हाण यशवंतराव व भाई बागल
“माधवराव बागल बोलल्यामुळे त्याला ब्राह्मण-ब्राह्मणेतर असा रंग देण्यापेक्षा गरीब शेतक-यांच्या वर्गाचे प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने आपण त्याचा विचार केला पाहिजे. कारण दुर्दैवाने माधवराव बागल हे कोल्हापूरचे होते आणि सत्यशोधक चळवळीत मनापासून भाग घेत होते.” (पृ. १०५)
‘दुर्दैवाने माधवराव...’ असे ‘दुर्दैवाने’ हा शब्द बागलांच्यामागे चव्हाणांनी योजला आहे! वाळवे-क-हाड भागात शेतकरी लोकांच्या प्रश्नावर अनेक सभा घेऊन या शेतकरी लोकांच्या प्रश्नावर बागलांनी तात्त्विक मांडणी केली. ही जोतिबा फुल्यांची परंपरा होती. त्या परंपरेशी सुसंगत अशी मानसिक भूमी राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या चळवळीतही निर्माण केली पाहिजे. हा त्याचा खरा अर्थ होता. “निव्वळ इंग्रजांना दोष देण्याची सवय लागलेल्या मंडळींना ही गोष्ट नवीन होती. त्यांना वाटत होते, की देशातून इंग्रजांचे राज्य जावे, पण सामाजिक व आर्थिक प्रश्नांना कोणी हात लावू नये” (पृ. १०५). ‘सामाजिक आणि आर्थिक प्रश्नांना हात लावू नये’ हा विचारच ‘दुर्दैवी’ होता. फक्त निव्वळ ब्राह्मणांना दोष देण्याची सत्यशोधकीय ब्राह्मणेत्तरांची सवय यशवंतरावांना आवडली नव्हती. त्याचप्रमाणे निव्वळ इंग्रजांना दोष देण्याची उच्चभ्रूंची प्रथा यशवंतरावांना आवडली नाही (पृ. १०५). मसूर व क-हाड येथील सभातून त्यांना जो अनुभव आला त्यामुळे सत्यशोधकीय चळवळीला त्यांना मनातून अजिबात विसर होणे अशक्य होते. उदा.