शेजारी देशांबरोबर चांगले संबंध असावेत, हा पं. नेहरूंच्या परराष्ट्रिय धोरणाचा एक महत्त्वाचा घटक होता आणि म्हणून या धोरणाचा वारसा आपण त्यांच्याकडून घेतलेला आहे. त्या चौकटीशी आणि मूळ सिद्धांताशी आपण प्रामाणिक राहिलो, तर कोणत्याच परराष्ट्रमंत्र्याकडून चूक घडणार नाही. मात्र त्यासाठी नेहरूंनी आपल्या परराष्ट्रिय धोरणाचा पाया घातलेला आहे, तो स्वीकारण्याचा प्रामाणिकपणाही दाखवायला हवा.
पाकिस्तानबरोबरचे आपले संबंध सध्या काही प्रमाणामध्ये सुधारले आहेत, हे खरे असले, तरी ही प्रक्रिया सरकार अधिकारावर येण्याच्या ब-याच पूर्वीपासून सुरू झालेली होती. मागच्या सरकारच्या कारकिर्दीतच ती सुरू झालेली होती. जेव्हा बांगला देशाचा संग्राम सुरू झाला, तेव्हा भारतीय उपखंडात तणावाचे आणि संघर्षाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु त्या संघर्षानंतर बांगला देशाचा उदय झाला आणि नंतर नवे पर्व सुरू झाले. त्याच काळात भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान सिमला करार आणि अन्य करारही झाले. तेव्हापासून या दोन देशांदरम्यानचे संबंध हळूहळू सुधारू लागले.
कोणत्याही दोन देशांदरम्यानच्या संबंधांत सुधारणा होणे, हे केवळ शेजारी राष्ट्राबाबतच महत्त्वाचे असते, असे नव्हे, तर सर्व देशांबाबतही हेच म्हणावे लागते. म्हणून आपण द्विपक्षीय संबंधावर विशेष भर देऊन इतर देशांबरोबरही द्विपक्षीय आणि राजनैतिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. द्विपक्षीय कराराचे धोरण सध्याच्या सरकारने चालू ठेवले आहे, ही आनंदाची बाब आहे. मात्र किरकोळ प्रश्नांबाबत असे द्विपक्षीय करार करून फार महत्त्वाचे काही साध्य होणार नाही, हे विसरता कामा नये.
पाकिस्तान अणुऊर्जेच्या क्षेत्रात काय करीत आहे आणि त्या बाबतीत त्याने चीन, फ्रान्स आदी देशांशी कोणते करार केलेले आहेत, हे सरकारने आम्हांला सांगितले पाहिजे. तसेच पाकिस्तानच्या मनात काय आहे, हेही कळायला हवे. पाकिस्तानच्या हेतूंबाबत आणि तयारीबाबत आपण सतत जागरूक राहण्याची गरज आहे. सरकारला याची जाणीव असावी, अशी मी आशा करतो.
नेपाळबरोबरचे आपले संबंध नेहमीच चांगले राहिले आहेत. नेपाळचे भारताबरोबरच्या संबंधात काही गैरसमज होते. आणि त्यामुळे त्याला भारताबरोबर प्रवासी सोयीसाठी वेगळा करार करावा, असे वाटत होते. नेपाळच्या दडपणापुढे मान तुकवून आपण एक करार करण्याऐवजी व्यापार आणि प्रवासी वाहतूक यांबाबत दोन वेगवेगळे करार केले, तर त्यांतून अनेक प्रश्न निर्माण होतील, म्हणून पुढे धोकादायक परिस्थिती उत्पन्न होईल, असे काहीही न करण्याची सरकारने दक्षता घ्यायला हवी.
शेजारी देशांबरोबरच्या संबंधात सरकार वस्तुस्थितीपासून दूर जात आहे, असे मला वाटते. ते देश लहान असले, तरी आपल्या देशाच्या विशाल आकारामुळे त्यांच्या मनांत आपल्यासंबंधी काही गंड असणे शक्य आहे, हे लक्षात घ्यायला हवे. लहान देशांबरोबर मैत्रीचे संबंध निर्माण करताना आपण उदार असले पाहिजे, हे खरे असले, तरी त्यांच्या गैरवाजवी मागण्या मान्य करण्याची चूक आपण टाळलीच पाहिजे.