माझा नम्र दावा आहे, की महाराष्ट्रातील राजकारण हे जातीयवादापासून अलिप्त राहावे, यासाठी मी मनस्वी कष्ट घेतले आहेत. महाराष्ट्रात असताना तेथील माझ्या कर्तेपणाच्या दिवसांत आणि नंतरही मी त्यासाठी पराकाष्ठेचे प्रयत्न केले. मनातून स्वत: मी कधी जातीयवादी भावनेला बळी पडलो नाही. उलट, समाजात एकजिनसीपणा आणण्याचेच ध्येय मी मनाशी निरंतर बाळगले.
महाराष्ट्रात कोणत्या पक्षाचे सरकार बनवायचे, हे अखेरीस जनतेच्या स्वाधीन आहे. काँग्रेसचे सरकार यावे, यासाठी अर्थातच मी शर्थीचे प्रयत्न करीन. परंतु याचा अर्थ महाराष्ट्राचा समाज दुभंगावा, फुटावा किंवा जातीयवादाने डोके वर काढावे, असा नव्हे. राजकारण करण्यासाठी म्हणून जातीयवाद राबवावा, या विचारापासून मी नेहमीच अलिप्त राहिलो आहे. माझ्यावर जातीयवादाचा आरोप करणारांना मला असे विचारायचेय, की माझे कोणते विधान जातीयवादाला आवाहन आणि प्रोत्साहन देणारे आहे? जनता पक्षावर टीका करताना, जनसंघावर आणि रा. स्व. संघावर मी जरूर टीका करतो आणि यापुढेही करीन. परंतु मी ही टीका करतो, त्यावेळी माझ्यासमोर समाजातील एक विशिष्ट वर्ग असतो, अशी शहाण्यासुरत्या पुढाऱ्यांची टीका जेव्हा ऐकतो, तेव्हा खेद वाटतो. जनसंघावर आणि रा. स्व. संघावर टीका करणारा मी कोण एकटाच आहे? टीकाकारांना अभिप्रेत असणा-या वर्गात संघ-जनसंघाचे टीकाकार नाहीत, असे त्यांना म्हणावयाचे आहे काय?
जनसंघ, रा. स्व. संघावर मी टीका करताच श्री. एस्. एम्. जोशी यांच्यासारखे राजकारणी विचारवंत 'म्हणजे ब्राह्मण समाजावरच ना ही टीका?' असे स्वत:चे विधान त्याला जोडून पुढे सरसावतात, याला काय म्हणावे? श्री. एस्. एम्. जोशी यांच्याबद्दल मला नेहमीच आदर वाटत आला आहे. परंतु माझ्या भाषणावरचे असे हे विपरीत भाष्य जोशीबुवा व त्यांचे सहकारी करीत आहेत, ही आश्चर्याची गोष्ट आहे. यातल्या वैयक्तिक बदनामीची मला चिंता वाटत नाही. पण या मंडळींनाच महाराष्ट्रातील निवडणूक-प्रचाराला जातीय स्वरूप द्यावयाचे आहे, की काय, अशी चिंता मनात निर्माण होते आणि खेद वाटतो. वस्तुत: महाराष्ट्रातले सार्वजनिक जीवन गेल्या पाव शतकात ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादापासून मुक्त झाले आहे. माझ्या थोर मित्रांना मी विनंती करेन, की मी जे उच्चारले नाही, माझ्या मनात जे नाही, त्याचा आरोप करून कृपया माझ्यावर अन्याय करू नका. माझी शक्ती कमी व्हावी, ही त्यांची इच्छा मी समजू शकतो. परंतु त्यासाठी याच मार्गाचा अवलंब कशाला? एका चांगल्या पद्धतीने सार्वजनिक जीवन पुढे जात असताना ते जीवन निवडणुकीच्या स्वार्थासाठी म्हणून मलिन करू नका, एवढेच मी म्हणेन.
जातीय विचार हा माझ्या जीवनात अशक्य आहे, हे काय या मंडळींना माहीत नाही? खरे म्हणजे माझ्या खासगी जीवनातल्या गोष्टींची मी सार्वजनिकरीत्या वाच्यता करू नये. तसे काही सांगण्याची माझ्यावर कोणी वेळही आणू नये. परंतु अशा तऱ्हेचे आरोप केले जातात, तेव्हा खंत वाटते.