• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

भूमिका-१ (143)

या सर्व प्रश्नांची उत्तरे नकारार्थी आहेत, हे मला स्पष्टपणे सांगितलेच पाहिजे. काँग्रेसची मूलभूत धोरणे किंवा तिने घडवून आणलेली प्रगती याविरुद्ध लोकांनी कौल दिलेला नाही. यांपैकी काही धोरणांची आणीबाणीमध्ये जी अतिरेकी आणि कठोर अंमलबजावणी झाली, तिच्याविरुद्ध लोक संतापले, हे खरे आहे. अधिकाराचा हा असा गैरवापर ही मी राष्ट्रिय शोकांतिका मानतो. या अनुभवापासून काँग्रेसला मोठाच धडा मिळाला आहे. लोकहितकारी धोरणे आणि त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी यांत अंतर पडले, की काय घडते, हे यावरून कळून आले. दीर्घकालीन राष्ट्रिय हिताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला कुटुंबनियोजनाचा कार्यक्रमही काही राज्यांमध्ये अशा रीतीने हाताळण्यात आला, की त्यामुळे तेथे संतापाची लाट उसळली. आणीबाणीचे आणि निवडणुकीचे धडे काँग्रेस शिकली आहे, असे मी देशाला आश्वासन देतो; परंतु त्याचबरोबर मला असेही सांगायचे आहे, की या एका विशिष्ट घटनेमुळे, काँग्रेसने जी प्रदीर्घ देशसेवा केली आहे, तिचे विस्मरण होता कामा नये.

भारत हा विशाल आणि वैविध्यपूर्ण देश आहे आणि त्यामुळे त्याचे शासन सांभाळणे ही सोपी गोष्ट नाही. हे कार्य नव्या सरकारने स्वीकारले आहे. श्री. मोरारजी देसाई यांच्यासारख्या स्वातंत्र्यसंग्रामातील नेत्याने आणि काँग्रेसच्या राज्य नि केंद्र शासनांमधील महत्त्वाची अधिकारपदे सांभाळलेल्या प्रशासकाने या नव्या सरकारचे धुरीणत्व अंगीकारले आहे. राष्ट्रउभारणीच्या कार्यामध्ये आमचा पक्ष नव्या सरकारशी सहकार्य करील, असे मी त्यांना आश्वासन देतो. नवे सरकार आमच्या सहकार्याचा आदर करील, अशी मला आशा आहे.

राज्यकारभार करताना नकारात्मक दृष्टिकोण उपयुक्त ठरणार नाही, असे मला आग्रहाने सांगावेसे वाटते. म्हणून सूडबुद्धीने वागण्याचा मोह कटाक्षाने टाळला पाहिजे. आपण सर्वचजण लोकशाही मूल्ये मानतो. म्हणून भूतकाळात जे प्रमाद घडले असतील, ते विसरून जाऊन परस्पर सहकार्याने पुढील वाटचाल केली पाहिजे. गेल्या काही वर्षांमध्ये देशात जो कडवटपणा निर्माण झाला, तेवढा तो बस्स झाला, असे मानून विशाल राष्ट्रिय सामंजस्याचा मार्ग चोखाळू या. तसे झाले, तरच आपल्या या प्रिय मातृभूमीचा आपण सर्व क्षेत्रांमध्ये विकास घडवून आणू शकू. तसेच आपल्या सर्व देशबांधवांना सामाजिक मुक्तता, आर्थिक प्रगती आणि बौद्धिक नि आध्यात्मिक विकास यांचा लाभ करून देता येईल.