यशोधन-२४

महापुरूषांच्या निर्मितीला, त्यांच्या कार्याला, त्यांच्या पराक्रमाला काही सामाजिक कारणपरंपरा असावी लागते. त्यांच्या पाठीमागे हळूहळू समाजजीवनाची शक्ती निर्माण व्हावी लागते. शिवाजीमहाराज म्हणजे फक्त भवानादेवीचा प्रसाद असे मानीत नाही. शिवाजीमहाराजांचे जीवन हे मराठी जनतेच्या जीवनाचा प्रसाद आहे, अशी माझी स्वत:ची भावना आहे.
 
कुठल्याही समाजातील कर्तृत्त्वान मनुष्य हा समाजाला सोडून कर्तृत्व करूच शकत नाही. नवनीत म्हणजे आपण ज्याला लोणी म्हणतो, ते दुधातून येते. दूध नसेल तर लोणी नाही. समाजजीवन जेव्हा खळखलेले असते, तेव्हा त्यामध्ये काहीतरी साचत असते. नवनीत निर्मिणा-या दुधाप्रमाणे त्यात एक शक्ती असते. नवनीताला स्वतंत्र अस्तित्त्व असते ही खोटी गोष्ट आहे. तीच गोष्ट कुठल्याही कर्तृत्त्ववान दिसणा-या माणसाच्या जीवनासंबंधीही खरी आहे.

महाराष्ट्रातील बहुसंख्य वस्ती खेड्यात आहे आणि त्यात मराठा समाज बहुसंख्येने जास्त असल्याने महार-चांभार-ब्राह्मण-सुतार-माळी इत्यादी अल्पसंख्य लोकांचे रक्षण करण्याची जबाबदारी मराठ्यांवर आहे.
 
‘मराठा’ हा जातिवाचक नाही. आचार्य अत्र्यांनी आपल्या वर्तमानपत्राला ‘मराठा’ हे नाव दिले, तर काय तो शब्द जातीयवाचक आहे म्हणून दिले? ‘मराठा’ शब्दामागे महाराष्ट्राच्या एकजिनसी जीवनाची भावना आहे. ‘मराठा’ शब्दाचा हाच अर्थ आम्हांला अभिप्रेत आहे आणि म्हणून मराठी राज्य हे कोणा एका जमातीचे राज्य मुळीच होता कामा नये, या गोष्टीवर माझा जरूर विश्वास आहे.

मॉन्ट्रीयल येथील मॅग्गील विद्यापीठातील इस्लामी संस्कृतीच्या अध्ययनशाखेचे प्रमुख प्रा. विलफ्रेड कॅन्टवेल स्मिथ यांनी मुसलमानांच्या संबंधी खालीलप्रमाणे उदगार काढले आहेत :

“भारतातील मुसलमानांचे भवितव्य हे जगातील इतर मुसलमानांच्या किंबहुना सर्वच जनसमूहाच्या भवितव्याप्रमाणे, त्यांच्या आत्मिक बलावर, श्रध्देवर व सर्जनशीलतेवर आणि अन्य बांधवांबरोबरच्या त्यांच्या संबंधावर अवलंबून आहे.” परिस्थितीशी त्यांनी जुळवून घेतले, तर कोणतीही गोष्ट त्यांना असाध्य नाही. वास्तविक पाहता त्यांची भूमिका पुढाकाराची राहणार असून ही भूमिका ते योग्य प्रकारे पार पाडू शकले, तर ते आपल्या देशाची यथोचित सेवा करतील, एवढेच नव्हे तर झपाट्याने बदलत असलेल्या सध्याच्या जगात इस्लामच्या धर्माचीही त्यांच्याकडून सेवा घडेल.

धर्मनिरपेक्षतेच्या विचाराचा खरा निश्चित अर्थ काय?  या विचाराचे दोन भाग आहेत. या विचाराचा पहिला जो अर्थ आहे तो म्हणजे निधर्मता, धर्मनिरपेक्षता. परंतु त्यासाठी विनोबाजींनी जो शब्द वापरला आहे तो फार चांगला आहे. तो शब्द म्हणजे सर्वधर्मसमभाव. मी हिंदू आहे, मला हिंदुधर्म प्रिय आहे. पण मला हिंदुधर्म प्रिय असला तरी मुसलमानी धर्मासंबंधी, ख्रिस्ती धर्मासंबंधी माझ्या मनात विरोधी भाव नसला पाहिजे. ही एक पहिली, एक मानसिक भावना झाली. पण या विचाराचा अर्थ निव्वळ धर्मनिरपेक्षता असा नाही. त्याचा दुसराही एक महत्त्वाचा भाग आहे आणि तो भाग असा आहे की, मी जेव्हा राजकारण करीन, तेव्हा माझ्या राजकारणामध्ये मी धर्माला प्राधान्य देणार नाही; तेथे धर्माला स्थान नाही. राजकारणामध्ये जेव्हा धर्माला प्राधान्य येते, तेव्हा ते राजकारण जातीयवादी बनते. पण जातीयवादी राजकारण म्हणजे काय? जेव्हा तुम्ही राजकारणाचा विचार करता; आणि मी हिंदू आहे व हिंदुत्वाचा मला विचार केला पाहिजे, माझ्या हिंदुत्वाला जास्त प्रतिष्ठा प्राप्त झाली पाहिजे, किंवा माझ्या इस्लामला जास्त प्रतिष्ठा मिळाली पाहिजे असा ज्या वेळी तुम्ही मनात विचार आणता, त्यावेळी राजकारण जातीयवादी बनते. या जातीयवादी राजकारणाचा दुसराही एक महत्त्वाचा भाग आहे. जे लहान लहान अल्पसंख्य आहेत त्यांच्या मनामध्ये संशय निर्माण झाला, शंका निर्माण  झाली, तर ती समजण्यासारखी आहे. परंतु जो बहुसंख्य समाज आहे तोच जर जातीयवादी झाला, तर राष्ट्र संपले म्हणून समजावे.