• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

यशोधन-३

कॉफी घेऊन बाहेर पडलो. त्यांच्या कार्यालयातील लोक, हल्ली काय वाट्टेल ती माणसे येऊन साहेबांचा अर्धा अर्धा तास घेतात, असा चेहरा करून उभी होती. मला त्याची पर्वा नव्हती. मी फड जिंकणा-या मल्लाच्या थाटात होतो. पहिल्याच ‘सा’ला नवीन गायकाला जाणकारांकडून उत्स्फूर्त दाद मिळाल्यावर जशी होईल, तशी माझी अवस्था झाली होती. शिवाय “दिल्लीत आलास, की भेटत जा” हे आमंत्रण होतेच. तेवढे मला पुरे होते. मी संधी मिळेल तेव्हा भेटत होतो. तेही मनमोकळेपणाने बोलत होते. शेरोशायरी, गझलांची देवाण-घेवाण होत होती. त्यांच्या शालेय जीवनातील कविता, प्रवासातील अनुभव, व्यक्तिचित्रे व किस्से ऐकायला मिळू लागले. या माणसाला विलक्षण स्मरणशक्ति, शब्दांचे वेड व संभाषणचातुर्य आहे, असे प्रत्येक भेटीत जाणवत असे.

एक प्रसंग मला आठवतो. ते मुंबईला आहेत असे समजल्याने मी भेटीसाठी गेलो. ते बाहेर पडण्याच्या तयारीत होते. मी नमस्कार करून बाजूला उभा राहिलो. त्यांनी ‘चला’
म्हटल्यावर गाडीत बसलो. नंतर समजले की, पुणे जिल्ह्यात तळेगाव येथे कार्यक्रम आहे. मी मनात म्हणालो, “चला, तीन तास हक्काचे मिळाले.” प्रवासात मी त्यांना व्हिएतनाम युध्दावर लिहिल्या गेलेल्या दोन हिंदी कविता म्हणून दाखविल्या व अमीर खुश्रू यांचे काही शेर सांगितले. प्रवासात इतरही गप्पा झाल्या. तळेगावला पोचल्यावर सभा सुरू झाली. भाषणातील एक संदर्भ देताना त्यांनी प्रवासात ऐकलेल्या अमीर खुश्रूच्या काव्यपंक्ती :

‘एक कडी तो जंजीर नहीं
एक नुक्ता तो तसवीर नहीं
तकदीर कौमोंकी होती है
एक शख्स की तकदीर, तो तकदीर नहीं’

या जशाच्या तशा म्हणून दाखविल्या. एकदा सहज ऐकल्यानंतर या काव्यपंक्ती लक्षात ठेवणा-या त्यांच्या स्मरणशक्तीला मी मनातल्या मनात सलाम केला.

त्यांच्या संभाषणचातुर्याचा एक प्रसंग आठवतो. गोहत्ती येथील काँग्रेस अधिवेशनात त्यांनी काही लोकांना रात्री त्यांच्या बंगल्यावर जेवायला बोलावले होते. मी जेवायला गेलो. सोबत श्री. वसंतराव नाईक, काश्मीरचे त्या वेळचे मंत्री ठाकूर रणधीरसिंग व कलकत्याचे एक व्यापारी होते. ते व्यापारी शाकाहारी आहेत हे जेवायला बसल्यावर समजले. साहजिकच ऐनवेळी थोडी धावपळ झाली. जेवणाचे टेबल लावले गेले. ते व्यापारी म्हणाले, “जगातील सर्व शक्तिमान प्राणी शाकाहारी आहेत.”  साहेबांनी पुष्टी जोडली, “होय, जगातील सर्व उपयुक्त प्राणी शाकाहारी आहेत.” टेबलावर हशा पिकला. व्यापारी पुन: म्हणाले, “हे सर्व प्राणी शक्तिमान आहेत, कारण ते शाकाहारी आहेत.” साहेब म्हणाले, “आणि म्हणूनच त्यांच्यावर स्वार होणे सोपे आहे.” बोलण्याच्या ओघात कोठेही त्या शाकाहारी माणसाचा अहंकार न दुखावता साहेबांनी आपला मुद्दा सोडला नाही. क्षणाचाही विलंब न लावता ते समर्पक उत्तरे देत होते. बोलताना व ऐकताना त्यांचा चेहरा अतिशय बोलका असे. आपण उच्चारलेल्या प्रत्येक वाक्यागणिक त्यांच्या चेह-यावर प्रतिक्रिया व्यक्त होत असत. सहमत असल्याच्या, नसल्याच्या, रागाच्या, आनंदाच्या, मिश्किलपणाच्या! आपल्याला बोलण्यासाठी योग्य वेळ दिल्यानंतर जर आपण पाल्हाळ लावला तर ते नुसतेच “हाँ  ठीक आहे” असे म्हणत. त्या वे्ळी त्यांच्या चेह-यावरचे भाव व त्यांच्या वाक्य उच्चारण्याच्या पध्दतीवरूनच, आपल्याला न सांगता “बाबारे, तुझं काम झालं आहे, तू जा”  असे कळे. आपण ‘येतो’ म्हणाल्यानंतर ते दारापर्यंत पोचवायला येत. पध्दत म्हणून!  कितीही छोटा कार्यकर्ता असला तरी !! असाच एक भारावलेला कार्यकर्ता, साहेब आपल्याला दारापर्यंत पोचवायला आल्याचे मला सांगत होता. मी त्याला म्हणालो, “अरे साहेब हुशार आहेत. आपण खरेच जातो किंवा नाही, हे पाहायला ते दारापर्यंत येतात.”  माझ्या उत्तराचा त्याने एवढा धसका घेतला की, तो हल्ली माझाजवळ ‘दिल्लीला गेलो होतो’ हे सुध्दा सांगत नाही.