भारत स्वातंत्र झाला. अनेक वर्षांची कार्यकर्त्यांची तपश्चर्या फळास आली. स्वातंत्र्यप्राप्तीचा आनंद केवढा असेल म्हणून सांगू ? माझ्यासारखे छोटे मोठे कार्यकर्ते कृतार्थतेचे निश्वास टाकून आलेल्या स्वातंत्र्याचे सहर्ष स्वागत करीत राहिले. पण आलेल्या स्वातंत्र्यलक्ष्मीचे स्वागत करून स्वस्थ बसून भागणार नाहीं अशी जाणीव होऊ लागली. स्वराज्याचे सुराज्य झाले पाहिजे. किंबहुना ‘रामराज्य’ केले पाहिजे; या विचारानें विचारी, ध्येयवादी कार्यकर्त्यांनी आपापली कार्यक्षेत्रे निवडून घेऊन कार्यास प्रारंभ करावयास पाहिजे होता. पण काय ?
श्री. यशवंतरावासारख्या प्रज्ञावंत राजकारभार कुशलावर नेतेपणाची जबाबदारी येऊन पडली. श्री. यशवंतरावांच्या कार्यकर्तृत्वाबद्दल कांहीं सांगण्याची आवश्यकता आहे असे नाहींच. कराड तालुका किंवा सातारा जिल्हाच नव्हे, तर महाराष्ट्र प्रांताची महामर्यादा ओलांडून ते अखिल भारताच्या भव्य पातळीवर स्वयंप्रज्ञेच्या जोरावर तळपू लागले असून जागतिक लौकिकाच्या क्षितीजावर डोकावू लागले आहेत. मला एवढाच आनंद आणि अभिमान कीं. बालपणापासून ज्याच्याकडे कांही अपेक्षेनें मी पाहिले, ती माझी दृष्टी सफल पूर्ण झाली. पण माझ्यासारखे अल्पसंतुष्ट आपल्या कुवतीप्रमाणें कार्यक्षेत्र निवडून घेऊन ते पार पाडण्याच्या मागे लागले.
स्वराज्यांत लोकशिक्षण आणि आरोग्य या दोन गोष्टीकडे लक्ष पुरविण्याच्या दृष्टीनें मी पाऊल टाकण्यास सुरवात केली. डॉ. एस्. एम्. कुलकर्णी यांच्या सहकार्यांनें ‘भडकमकर धर्मार्थ हास्पिटलचे’ कार्य वाढविण्याच्या व स्थैर्य आणण्याच्या दृष्टीनें प्रयत्न सुरूं केले, ते यशस्वी होऊ लागले. पण दुर्दैव असे कीं, विघ्नसंतोषी लोकांच्या कारवायामुळें संपूर्णतया नाउमेद व्हावयाचा प्रसंग आला. त्यांतच डॉ. कुलकर्णी यांच्या परदेशीय आगमनानंतर अकाली निधनानें हॉस्पिटल बंद करावे लागले. शैक्षणिक कार्याच्या दृष्टीनें आमच्या प्रयत्नांनी ‘श्री शिवाजी एज्यूकेशन सोसायटीची’ स्थापना होऊन ते कार्य चढत्या वाढत्या श्रेणीने चालूं राहिेले आहे. पण वयाच्या दृष्टीने व संधीसाधू वृत्तीनें स्वार्थ साधणा-या वृत्ती समाजांत पावलोपावली ख-या कार्यकर्त्यांच्या मार्गात अडथळे व अडचणी उत्पन्न करू लागल्यामुळें कार्यनाश होऊ नये म्हणून झाली एवढी देशसेवा पुरे झाली. अशा वृत्तीने राजकारणांतील आपली लुडबुड थांबविली आहे. पण त्याबरोबर शेवटी हेहि सांगितले पाहिजे कीं, मनांत जोपासलेली देशभक्तिची बीजे जेथें जेथें आणि जेव्हां जेव्हां सवड सापडेल तेथें तेथें व तेंव्हा तेव्हां वर उफाळून आल्याखेरीज राहात नाहींत. परमेश्वर सत्कार्याला केव्हांही साहाय्य करीत राहाणारच अशी आंतरीक प्रामाणिक ध्येयनिष्ठा बाळगून राहणे हेच आतां माझे कार्य आहे.
बैद्धिक, शारिरीक किंवा सांपत्तिक यातील कोणतीहि जबरदस्त अशी शक्ति नसतांना सन १९२४ ते १९३० विधायक कार्य. सन १९३० साली मिठाचा सत्याग्रहाबद्दल ३ महिने साधी व सभा, प्रभातफे-यांमुळें ६ महिने सश्रम करावास. सन १९३२ साली हजेरीभंगाबद्दल १ वर्ष सश्रम व दंडाबद्दल तीन महिने. तसेंच सन १९४२ साली डेटिन्यू म्हणून ३३ महिने कारावास मी आनंदानें भोगला. परमेश्वर कृपेनें भारताला स्वातंत्र्यप्राप्ती होऊन लोकशाही राजवट देशांत सुरू झालेली पहाणेचे भाग्य माल लाभले याबद्दल मी त्या जगन्नियंत्याचा सदैव ऋणीच राहिन.
जयहिन्द !