गणपतरावांशी नंतर माझी जी चर्चा झाली, त्यावेळी मी त्यांना सांगितले, की महात्मा फुल्यांचे चरित्र वाचल्यानंतर मला काही तरी नवीन वाचल्यासारखे वाटले. त्यांनी उभे केलेले प्रश्र महत्त्वाचे आहेत; पण त्यासाठी कोठल्या तरी एका जातीचा द्वेष केला पाहिजे, ही गोष्ट काही मला पटत नाही. जे समाज मागे पडले आहेत, त्यांना जागृत करणे, त्यांच्यात नवीन धारणा निर्माण करणे हाच एक मार्ग उत्तम आहे, अशी माझी बाजू होती. आम्ही एकमेकांचे विचार समजत होतो, त्यामुळे एकमेकांचे ऐकून घ्यायचे आणि वाचत राहायचे, असा समेट आम्ही दोघांनी केला.
ह्या सर्व चर्चेचा माझ्या मनावर एक परिणाम असा झाला, की पुष्कळसे असे महत्त्वाचे प्रश्र आहेत, की जे आपल्याला अजून आकलन होत नाहीत व ते आपण समजावून घेतले पाहिजेत, हे तीव्रतेने जाणवले. यासाठी मोठ्या आणि शहाण्या मंडळींशी बोलले पाहिजे, इतरांशी संभाषण आणि संवाद केला पाहिजे, अशीही जाणीव झाली. आणि तेच करण्याचा मी निर्णय केला. माझ्या त्या वयात मी एका स्थित्यंतरातून चाललो होतो, त्याची ही साक्ष आहे.
पुढे मी टिळक हायस्कूलचा विद्यार्थी झालो आणि टिळकांच्या संबंधाने पुष्कळच वाचायला मिळाले. त्यांचे चरित्र, त्यांच्या लेखांची पुस्तकेही आम्हांला वाचावीच लागत असत. कारण कराडच्या या शाळेत एक चांगली प्रथा अशी होती, की टिळकांचे विचार आणि आयुष्य यासंबंधाने विद्यार्थ्यांमध्ये निबंध-स्पर्धा आणि वक्तृत्व-स्पर्धा दरवर्षी घेत असत. या दोन्हींमध्ये भाग घेण्याची माझी उत्सुकता असे आणि त्यासाठी हे वाचन मला अपरिहार्य झाले. टिळकांच्या व्यक्तिमत्त्वाचा जबरदस्त परिणाम भावनांवर झाला आणि जाती-जमातींचे जे प्रश्न आहेत, त्यांच्या बाहेर राहून काही राष्ट्रीय स्वरूपाचे असे जे प्रश्न आहेत, त्यांसाठी आपण, काही तरी केले पाहिजे, हा विचार माझ्या मनामध्ये आला. नाही म्हटले, तरी माझ्या मनामध्ये टिळक आणि ज्योतिराव फुले यांची तुलना होऊन गेली. या दोघांच्या विचारांमध्ये मला कोठे साम्य दिसले नाही. यामुळे थोडी खंत होती; पण शेवटी ही दोन्ही मोठी माणसे आहेत. आपण हा मोठा, की तो बरोबर, या उद्योगात आत्ताच पडू नये, असे माझ्या त्या वयातल्या मनाने घेतले आणि तो तुलनेचा विचार मी सोडून दिला. पण एक गोष्ट मात्र मनाशी निश्चित होती, की दोघांनी सांगितलेले विचार हे महत्त्वाचे आहेत. स्वराज्याचा विचार टिळकांनी सांगितला, आणि गरिबांची शिक्षणाने प्रगती झाली पाहिजे व समाजात समानता निर्माण झाली पाहिजे, हा विचार महात्मा ज्योतिराव फुल्यांनी सांगितला. हे दोन्ही विचार महत्त्वाचे, म्हणून दोन्ही माणसे आपल्या दृष्टीने मोठीच आहेत, या निर्णयाला मी माझ्या मनाशी आलो.
कराडच्या टिळक हायस्कूलप्रमाणेच पुण्याच्या नूतन मराठी विद्यालयातही दरवर्षी वक्तृत्व-स्पर्धा होत असत. त्या स्पर्धेत भाग घेण्याची मला तीव्र इच्छा होती. १९३१ साली पुण्यात होणा-या त्या स्पर्धेत मी भाग घेतला. पुण्याला जाण्या-येण्याचा प्रश्न होता, पण तो श्री. शिवाजीराव बटाणे यांनी सोडविला. विद्यार्थ्याला तेथे आयत्या वेळी विषय देऊन दहा मिनिटे बोलायला सांगत. 'ग्रामसुधारणा' हा विषय देऊन मला बोलायला सांगण्यात आले. माझे भाषण ऐकून परीक्षक खूश झालेले दिसले. त्यांनी मला आणखी दहा मिनिटे वेळ वाढवून दिला. भाषण झाल्यावर सर्वांनी माझे कौतुक केले व त्या स्पर्धेत मला पारितोषिक मिळाले. तेच पुढे १९३२ च्या जानेवारीमध्ये झालेल्या माझ्या शिक्षेच्या वेळी दंडापोटी सरकारजमा झाले.
आम्ही साजरा करीत असलेल्या शिवजयंती उत्सवाची हकीकत मी पूर्वी सांगितली आहे. त्यावेळी मला एक मजेदार अनुभव आला. भाषणाला माणसे कमी येत, पण शाहिरी पोवाडे आणि संगीत भजनांचे जे कार्यक्रम असत, त्यांना लोक तुफान गर्दी करत. अशा गर्दीची मला यापूर्वी सवय नव्हती. त्यामुळे जमलेली गर्दी हे समारंभाचे यश, असे एक नवीन समीकरण माझ्या मनाशी होऊ लागले. महाराष्ट्राचे तेव्हाचे प्रसिद्ध शाहिर खाडिलकर यांच्या पोवाड्याचे कार्यक्रम आम्ही दरसाल करत असू. त्यावेळी खाडिलकर हे अत्यंत लोकप्रिय आणि विद्वान शाहीर होते.