मराठी मातीचे वैभव- ८५

१९३२ मध्ये यशवंतरावांनी १८ महिने तुरुंगवास भोगला.  त्या वेळी ते साधे मॅट्रिकही नव्हते.  १९३७ साली डॉ. मानवेंद्रनाथ रॉय यांची ओळख झाली.  त्यांच्या 'Independent India' या पुस्तकाने यशवंतरावांच्या मनावर खोल ठसा उमटला.  या पुस्तकात क्रांतिविकासाचे तर्कनिष्ठ विवेचन आहे.  १९३९ साली दुसरे महायुद्ध सुरू झाले.  डॉ. मानवेंद्रनाथ रॉय यांनी इंग्रजांना साथ दिली, म्हणून ते काँग्रेसच्या बाजूने उभे राहिले.  १९४२ साली क्रांतिसिंह नाना पाटलांनी जे प्रतिसरकार स्थापन केले, त्यात यशवंतराव चव्हाण, वसंतराव पाटील, किसन वीर, जी. डी. लाड, हे सहभागी झाले.  

१९४६ साली खेर मंत्रिमंडळाने कोयना योजनेसंबंधी चर्चा केली.  यशवंतरावांनी ही योजना पूर्ण करण्यासाठी आग्रह धरला,  कारण या योजनेमुळे पश्चिम महाराष्ट्राचा कृत्रिऔद्योगिक विकास होणार होता.  शेती करणा-याला शेतीचा हक्क मिळावा यासाठी माधवराव बागलांनी फार मोठे आंदोलन उभे केले होते.  म्हणून यशवंतरावांनी १९४७ साली कर्ज निवारण कायदा, जमीन म-यादेचा कायदा, वेठबिगार बंदी, किमान वेतन कायदा इत्यादी कायद्यांविषयी चर्चा केली, आणि १९५६ ला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यावर काही कायदे अंमलबजावणीत आणले.  कमाल जमीन धारणा कायद्यामुळे शासनाला ९१० लाख जमीन मिळाली.  यातून त्यांची लोकशाही समाजवादाची दूरदृष्टी प्रगट होते.  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी नाटक, मराठी चित्रपट व लोककला यांना उदार आश्रय देऊन या कलांना प्रतिष्ठा प्राप्त करून दिली.  पंडित लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या मराठी विश्वकोषाला आर्थिक साहाय्य देऊन एका ऐतिहासिक कार्यनिर्मितीला प्रोत्साहन दिले.  मराठी साहित्यिकांच्या उत्कृष्ट निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी व नवोदित लेखकांना अभय देण्यासाठी एक स्वतंत्र साहित्य व संस्कृती मंडळ निर्माण केले, त्यामुळे दलित, शोषित व ग्रामीण साहित्यिकांना आपल्यामधील साहित्यगुणांना प्रगट करण्याची संधी प्राप्त झाली.  रूक्ष राजकारणात राहूनही त्यांनी आपल्यामधून साहित्यिक रसिक मरू दिला नाही.  सरस्वतीच्या दरबारात हजेरी लावताना ते आपली राजवस्त्रे उतरून ठेवीत असत आणि साहित्यिक व कलाकार यांच्यापुढे नतमस्तक होत असत.  मराठी मनाचा असा हा दिलदार राजा होता.  म्हणूनच आजचा नवमहाराष्ट्र निर्माण होऊ शकला.

१९६२ साली संरक्षणमंत्री म्हणून ते दिल्लीला जेव्हा आले तेव्हा पं. जवाहरलाल नेहरू म्हणाले,

"You are coming here in a Political Crisis.  I want you as a Political Leader who has proved himself a leader of the people."

पंडित नेहरूंनी दिलेले हे प्रशस्तिपत्र पुढे त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने सिद्ध केले.  सरदार पटेल व गोविंद वल्लभ पंत यांच्यानंतर समर्थपणे गृहखाते फक्त यशवंतरावांनीच सांभाळले.  ते १४ नोव्हेंबर १९६६ ला गृहमंत्री झाले.  गृहखाते सांभाळण्यापूर्वी म्हणजे ६ नोव्हेंबरला गोवध बंदीसंबंधी शासनाने आदेश जारी करावा म्हणून साधूंची निदर्शने झाली होती.  त्यांनी आपल्या कारकीर्दीचा प्रारंभ गोवर्धन पीठाचे शंकराचार्य यांच्या अटकेच्या निर्णयाने केला.  या धाडसी निर्णयामुळे ते अनेकजणांच्या टीकेचे लक्ष्य बनले.  त्यांनी अनेक ठाम निर्णय घेतले.  पंजाबच्या प्रश्नावर संत फत्तेसिंग यांनी आत्मदहनाची धमकी दिली.  ते २७ डिसेंबर १९६६ ला अग्निकुंडात प्रवेश करणार होते, पण त्या अगोदर यशवंतरावजींनी २६ डिसेंबर रोजी लोकसभेचे सभापती सरदार हुकूमसिंग यांना संत फत्तेसिंगाकडे पाठवले.  त्यांची शिष्टाई यशस्वी झाली.  १९६७ ला पोलिसांचे बंड झाले.  ८०० वर पोलिसांना अटक करावी लागली.  पण त्यामुळे पोलिसांविषयी त्यांच्या मनात कुठलाही आकस निर्माण झाला नाही.  याउलट त्यांनी पोलिसांच्या कल्याणका-यासाठी ५० लाख रुपये मंजूर केले.  नक्षलवादी चळवळ, बिगर काँग्रेसी राज्यातील कायदा व सुव्यवस्था, केंद्र राज्य संबंध, पंजाबचा चंदीगढवरील हक्क, विद्यार्थ्यांमधील वाढती बेशिस्त, जातीय दंगली व आसाम आणि नागालँडमधील सीमाप्रश्न अतिशय कौशल्यपूर्ण रीतीने हाताळले.  कुठलीही कटुना येऊ न देता असले किचकट प्रश्न सोडविणे किती अवघड असते, पण यशवंतराव या बाबतीत यशस्वी ठरले.  म्हणूनच त्यांना "Man of the Crisis" असे म्हणतात.  २३ जुलै १९६७ ला मद्रास येथून प्रकाशित होणा-या 'हिंदू' दैनिकात के. रंगास्वामी यांनी एक लेख प्रकाशित केला.  ते आपल्या लेखात म्हणतात, ''चव्हाण यांनी आपल्या कौशल्याने संसदेतील सर्व पक्षीय खासदारांवर छाप पाडली.  वस्तुतः काँग्रेस पक्षाला अनेक चव्हाणांची गरज आहे.  परंतु चव्हाणांच्या यशामळे अनेकांच्या मनात त्यांच्याबद्दल द्वेषच निर्माण झाला आहे.  चव्हाणांनी गृहमंत्रालयातील प्रश्न अतिशय कार्यक्षमतेने हाताळले.''  के. रंगास्वामींच्या या लेखाची आजही तीव्रतेने आठवण येते.  संरक्षण व गृहखात्यानंतर त्यांनी अर्थ, विदेश ही खाती सांभाळली.  त्यांच्या अभ्यासू वृत्तीमुळे त्यांनी जी जी खाती सांभाळली त्यावर स्वतःचा एक वेगळा ठसा उमटवला.

यशवंतरावजी एका व्याख्यानात म्हणाले होते, ''१९४७ पूर्वीची लढाई स्वातंत्र्याची लढाई होती.  आज आपणास मूल्ये व तत्त्वे जोपासण्यासाठी लढाई करावयाची आहे.  संघर्ष करावयाचा आहे.''  आज सांसदीय लोकशाहीपुढे जी आव्हाने आहेत त्यांपैकीच्या आव्हानांचा तत्त्वाच्या व मूल्यांच्या लढाईचा उल्लेख यशवंतरावांनी केला आहे.  राष्ट्रीय जीवनात जाणवणारा फुटीरपणा, सार्वजनिक जीवनातील चारित्र्यसंपन्नतेची उणीव यामुळे लोकशाही आतून पोखरली जात आहे.  अशा वेळी यशवंतरावांची आम्हाला फार तीव्रतेने आठवण येते.  सामान्य शेतक-याच्या पोटी जन्म घेऊन ते उपपंतप्रधानापर्यंत स्वकर्तृत्वाने पोहोचले.  ''मी यशवंतराव होणार'' हे लहानपणी त्यांनी गुरुजींना दिलेले उत्तर सार्थ ठरविले.  यशवंतरावांनी अनेक माणसे जोडली, उभी केली आणि त्यांच्यात चैतन्य निर्माण केले.  अनेक नेते निर्माण करणारे यशवंतराव ख-या अर्थाने लोकनेता होते.  ते मराठी मुलखातला कोहिनूर हिरा होते.  असा महापुरुष युगातून एखादाच निर्माण होतो.  त्यांच्या पवित्र स्मृतीला त्रिवार अभिवादन.