''तसा काही पत्रव्यवहार असण्याची शक्यता नाही. कोणाशी पत्रव्यवहार करण्याच्या फंदापासून वेणूबाईंनी स्वत:ला कटाक्षानं दूर ठेवलं होतं. त्यामुळं पत्रं... अशक्य आहे.'' यशवंतरावांनी सांगितलं.
आणि ते सत्य होतं. वेणूताई या दर्जेदार संसार करणारी आदर्श स्त्री हे चित्र स्वच्छ होतं. यशवंतरावांशी झालेल्या चर्चेतून हेच ध्वनित झालेलं होतं. परंतु माझ्यातला लेखक आणखी विधायक तपशील हस्तगत करण्याचा विचार करीत होता.
एके दिवशी, रात्री आम्ही बोलत असताना पुन्हा मी तोच आग्रह धरला. त्यावर पूर्वीचेच उत्तर मिळाले. पण, 'ठीक आहे, पाहू या तुमचा आग्रह आहे तर' असं म्हणून यशवंतराव कोचावरून उठले.
त्यांच्या बेडरूममध्ये आम्ही बसलो होतो. तिथं दोन कोच. एक त्यांचा, दुसरा वेणूताईंचा. मध्ये टीपॉय. त्यावर काही पुस्तके वगैरे. समोर सोफासेट. बाजूच्या भिंतीशी दोन मोठी कपाटं. ती वेणूताईंची. कुलूपबंद. त्या निघून गेल्यापासून ती तशीच उभी होती. बंद होती.
यशवंतराव कपाटापर्यंत गेले. हातात किल्ल्यांचा जुडगा होता. कपाटांकडे पहात स्तब्ध उभे राहिले. काही क्षण गेले अन् तसेच परतले. कोचावर बसले. डोळयांतून अश्रुधारा सुरू झाल्या!
निस्तब्ध शांतता. अस्वस्थता. कपाट उघडण्याचं धाडस त्यांना झालं नाही. मी स्वत: करू शकलो नाही. यशवंतरावांना सावरावं कसं... त्यासाठी शब्द उमटेना. तेवढयात बंगल्यातला नोकर - त्याचं नाव गंगा- बेडरूममध्ये आला. त्यानं काही निरोप सांगितला. तो जायला निघताच मी त्याला कपाट उघडण्यास सांगितलं.
त्यानं किल्ली हातात घेतली मात्र, यशवंतराव कपाटाशी पोहोचले. कपाट खुलं झालं. वेणूताईंची ऍटॅची काढून घेऊन ते कोचावर बसले.
''वेणूबाईंनी सर्व जतन करून ठेवलेलं दिसतंय'' ते म्हणाले. चेहेऱ्यावर आश्चर्य उमटलं. ऍटॅची उघडली तेव्हा कागदपत्रांची एक फाइल त्यांना मिळाली होती. फाइलीतील कागद ते क्रमानं पहात होते. माझी उत्सुकता शिगेस पोहोचली.
यशवंतरावांनी स्वत:च लिहिलेलं, पण आता काही वर्षांनंतर ते प्रथमच पहात होते. सर्व शाबूत असेल याची त्यांना कल्पना नसावी.