माझे वय सोळा-सतरा वर्षांचे असेल. कराडला त्या वेळी प्लेग सुरू होता. अर्धेअधिक गाव फुटले होते. लांब कुठे तरी दोन-तीन मैलांवर मोकळ्या रानात वस्त्या उभ्या होत्या. प्लेगच्या भीतीने माणसे रानावनांत पसरली होती. अगोदरच विस्कळीत झालेल्या समाजातील ही फुटाफूट अधिकच भयाण वाटावी अशी स्थिती होती. शाळा बंद होत्या, म्हणून अभ्यासही बंद होता. पण तेही एका दृष्टीने ठीकच होते. अभ्यासाकडे लक्ष देण्यास माझे मन तरी कुठे स्थिर होते ! त्या वेळच्या त्या घटना माझ्या मनात आजही ताज्या आहेत. क्रांतिकारकांच्या उठावणीचा तो काळ होता. लाहोर कटाच्या खटल्याने सा-या भारताचे चित्त खेचून घेतले होते. अनेक क्रांतिकारकांना त्या वेळच्या नोकरशाहीने तुरुंगात डांबून त्यांचे अनन्वित हाल मांडले होते. नोकरशाहीने ज्यांच्यावर दात धरला होता, अशा अनेकांना लाहोर कटाच्या जाळ्यात गोवले होते आणि त्यांतच बंगालचे प्रसिद्ध क्रांतिकारक श्री. जतींद्रनाथ दास हे एक होते. वस्तुत: लाहोरच्या कटाशी त्यांचा दूरान्वयानेही संबंध असल्याचे सिद्ध न करताच इंग्रजांनी त्यांना पकडले होते. १९२० सालच्या असहकाराच्या चळवळीत सामील झाल्यापासूनच नोकरशाहीचा त्यांच्यावर दात होता. पाच वर्षांत त्यांना चार वेळा तुरुंगात अडकविण्यात आले. चौथ्यांदा ते जेव्हा मैमनसिंगच्या तुरुंगात गेले, तेव्हा त्यांचा इतका छळ झाला, की वैतागून त्यांनी जेल सुपरिंटेंडेंटशी मारामारी केली. परंतु या गुन्ह्यामुळे त्यांना अंधारकोठडीची शिक्षा भोगावी लागली. तेथे जतींद्रनाथांनी उपवास आरंभिला. २३ दिवस त्यांनी उपाशीपोटी काढले, तेव्हा त्यांच्या तक्रारीची थोडीशी कुठे दाद लागली !
लाहोर कटात अडकवून त्यांना बंदिखान्यात टाकल्यानंतरही पुन्हा तसलाच प्रसंग उद्भवला होता. राजकीय कैद्यांना निर्ढावलेल्या बदमाश गुन्हेगारांप्रमाणे वागविले जात आहे, असे पाहून सात्त्विक संतापाने जतींद्रांनी तुरुंगात उपोषण आरंभिले होते. वृत्तपत्रांतून त्यांच्या उपोषणाच्या बातम्या नित्य येत असत. जतींद्रनाथांच्या अगोदरपासूनच सरदार भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी राजकीय कैद्यांना विशिष्ट सवलती मिळाव्यात म्हणून उपोषण आरंभिले होते. क्रांतिकारकांच्या या अन्नत्यागाच्या सत्याग्रहाने सा-या देशात चिंता पसरली होती. उपोषणाचा एकेक दिवस वाढत होता आणि नोकरशाही अधिकाधिक निगरगट्ट बनत चालली होती. या दोघां क्रांतिवीरांनी उपोषण सुरू करून एक महिना उलटला तरी इंग्रज राज्यकर्त्यांना घाम फुटेना, तेव्हा तुरुंगातील इतर कैद्यांनीही अन्नसत्याग्रह सुरू केला. त्यात जतींद्रही सामील झाले. त्यामुळे भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांच्या उपोषणास गंभीर व उग्र स्वरूप प्राप्त झाले आणि त्यापुढच्या प्रत्येक दिवशी भयाणपणा वाढतच गेला.