त्यांच्या बोलण्या-चालण्यात व वागण्यात नागपूरचा दिलदारपणा आला होता. माणूस मोठा रसिक होता. ते संगीताचे मोठे शौकीन होते. नागपूरच्या जीवनाला शोभेशा अशाच त्यांच्या आवडीनिवडी होत्या. विदर्भाच्या जीवनाशी ते संपूर्ण एकरूप झाले होते. संगीतादी विविध कलांचा आस्वाद घ्यायला लागणारी मनाची घडण त्यांच्यापाशी नैसर्गिक होती. तिला जाणकारीची जोड मिळाल्यामुळे ती जास्तच मनोरम झाली होती.
असे असले, तरी भाऊसाहेब स्पष्ट बोलणारे होते. त्यामुळेच त्यांचे अनेकांशी कदाचित वादही झाले असतील. त्यांना मित्रही थोडेच होते; पण जे होते, ते चांगले मित्र होते. आम्ही अनेक वेळा भेटलो, बोललो आहोत. त्यांच्या स्पष्ट बोलण्याचा एक प्रसंग मला नेहमी आठवतो. संयुक्त महाराष्ट्राचा तो काळ होता. त्यांनी माझ्याशी जाहीर संभाषण करणारा अग्रलेख 'तरुण भारता'त लिहिला होता. मथळा होता: 'संयुक्त महाराष्ट्र हे मराठी राज्य, की मराठा राज्य?' त्यांचा तो अग्रलेख अगदी स्पष्ट बोलणारा होता. हा वाद त्यांनी जाहीरपणे संभाषणाच्या स्वरूपात मांडला होता. साहजिकच मलाही त्याचे जाहीर उत्तर द्यावे लागले. सांगली येथील एका जाहीर सभेत मी, भाऊसाहेबांनी उपस्थित केलेल्या या प्रश्नाला जाहीर उत्तर दिले, की
'हे मराठी राज्यच राहील. आम्ही आमच्या जनतेला तसे वचन दिलेले आहे. आम्ही जनतेशी प्रतिज्ञाबद्ध आहोत, की हे राज्य मराठीच राहील.'
त्यानंतर जवळजवळ पाच वर्षांनी मी दिल्लीत संरक्षणमंत्री म्हणून जायचे ठरले. तत्पूर्वीच्या दौ-यात असाच मी एकदा नागपूरहून मुंबईला जायला निघालो होतो. त्या वेळी भाऊसाहेब मला भेटले आणि त्यांनी मला स्वत: होऊन सांगितले, की 'यशवंतराव, तुम्ही दिलेला शब्द राखलात.'
भाऊसाहेबांचे ते शब्द दिल्लीतील माझ्या आजपर्यंतच्या वास्तव्यात मला सतत शक्ती देत आले आहेत.