• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

ऋणानुबंध (19)

माझ्या आईचा जीव वाऱ्यावर उडाला. या माणसाबरोबर माझे मूल गेले आणि हा आपली साधने परत घेऊन आला, आता त्याचे तिथे काय होईल? या विचाराने तिला काही सुचेनासे झाले. त्यानंतर एक-दोन महिन्यांत गणपतरावांची पत्रे येऊ लागली. 'बाबूराव अजून परत का येत नाहीत? मी येथे एकटाच आहे. माझी प्रकृती बरी नाही. माझ्याजवळ साधनेही नाहीत' असा मजकूर त्यांत असे. त्यांची पत्रे पाहून आम्हा सर्व भावंडांना खूप दु:ख होई. मी त्या वयात एक पत्र माझ्या बंधूंच्या पत्त्यावर लिहिले व त्यात त्यांना परत यावयास सांगितले. त्यांचे उत्तर आले की पिके तोंडावर आली आहेत. ती सोडून कसा येऊ ? पण पिके काढण्यासाठी लागणारे पैसेही जवळ नाहीत, असेही उत्तर आले. ते पत्र पाहिल्यानंतर, का, कोण जाणे, माझ्या भावाला एकटे सोडून परत आलेल्या त्या सधन स्नेह्याबद्दल एक प्रकारची अढी माझ्या मनामध्ये निर्माण झाली. मनावर एकदम निराशेचे सावट आले. दूरदेशी असलेला आपला भाऊ अडचणीत आहे आणि आपण त्याकरिता काही करू शकत नाही, यातून निर्माण झालेली असहायता ही विलक्षण होती. कित्येक आठवडे मी त्या मन:स्थितीत होतो. आयुष्यभर मी अनेक संकटांमधून प्रवास केलेला आहे. त्यामुळे पुष्कळ वेळा मन निराशेने आकसून गेल्याचे मला आठवते. पण या वेळी मी जेवढा निराश झालो होतो, तेवढा केव्हाही झालो नाही.

काही आठवडयांनंतर एका दिवशी सकाळी पाहतो, तो माझा भाऊ घरी परत आलेला दिसला. अंगावर खाकी कपडे, अर्धी पँट घातलेल्या व थकून गेलेल्या माझ्या भावाची मूर्ती पाहून मी त्याच्या गळी पडलो. बराच काळ दबलेल्या निराशेने अश्रूंच्या द्वारे वाट काढली. माझा भाऊ  माझी समजूत करीत होता, 'अरे, असे दबून कसे चालेल? मला यातूनही काही शिकायला मिळाले.'

त्यानंतरचा मला आठवणारा व मी बराच जाणता झाल्यानंतरच्या काळातला माझा अनुभव :

१९३९च्या दुसऱ्या महायुद्धाबरोबरच हिंदुस्थानच्या राजकीय परिस्थितीत उलाढाली सुरू झाल्या. त्या वेळी पुण्यात कायद्याच्या अभ्यासासाठी राहत होतो. काहीशा जहालवादी राजकीय विचारसरणीतून माझी राजकीय वाढ झाली होती. मी ज्या विशिष्ट गटाबरोबर काँग्रेसमध्ये काम करीत होतो, त्यांच्याजवळ व काँग्रेसजवळही अशा ऐन मोक्याच्या वेळी स्वातंत्र्यसंग्राम तीव्र करण्याचा कसलाच कार्यक्रम नव्हता. एक प्रकारची दिशाहीनता तीव्रपणे जाणवू लागली. यातूनच माझ्या निराशेच्या कालखंडाला सुरुवात झाली. त्या काळात मी अनेकांशी चर्चा केल्या, बरोबरीच्या स्नेह्यांशी रात्रीच्या रात्री जागून वाद केले. डेक्कन जिमखान्यावर 'गुड्लक' रेस्टॉरंटमध्ये पीला हत्ती सिगारेटचा धूर सोडीत व तो पाहत मी तासन् तास एकाकी बसून काढले. लॉ कॉलेजमध्ये हजेरी देण्यापलीकडे अभ्यासात माझे लक्ष नव्हते. देश नेतृत्वहीन झाला आहे की काय, असे वाटू लागले. मनाचा कोंडमारा झाला होता. एकट्याने काही करावे, अशी शक्यता बुद्धीला पटत नव्हती. त्या वेळची ती निराशा माझ्या मनात घर करून कित्येक महिने राहिली होती. त्या वेळी माझे अभ्यासाचे वर्ष फुकट गेले. दुसरेही काही घडले नाही. निराशेच्या पोटी कृतिशून्यता निर्माण होते असे म्हणतात, ते माझ्या बाबतीत या वेळी खरे ठरले.