"म-हाडी भाषा जेतुलां ठाई वर्ते ते एक मण्डल ।
तयासि उत्तरे बालेघाटाचा सेवट असे । ऐंसे एक खंडमंडळ ।
मग उभय गंगातीर तेहि एक खंडमंडळ । आन तया पाटरोनि ।
मेधकरघाट ते एक मंडळ ।
तया पासोनि आवघे वराड: तेंहि एक मंडळ ।
पर आवघेचि मिळौनि महाराष्ट्राचि बोलिजे ।"
अशा रीतीने प्राचीन साहित्याचा आधार घेऊन उदाहरणांसह महाराष्ट्राचे वर्ण ते करतात आपल्या अशा रेशमी, नाजूक आणि प्रेमळ धाग्यांनी व लाघवी वाणीने विरोधकांनाही आपलेसे करत. आपल्या या खास भाषाशैलीतून एकतेचा, समतेचा विचार देत आणि नम्रशी वक्तृत्वाने श्रोत्यांना आपलेसे करण्याचा प्रयत्न करत.
यशवंतरावांच्या जीवनातील महत्त्वाची प्रेरणा ही राजकारण हीच होती. वयाच्या सोळाव्या वर्षी त्यानी राजकीय कार्याला सुरुवात केली होती. १९३२ च्या म. गांधींच्या सत्याग्रह आंदोलनामध्ये त्यांना झालेली तुरुंगवासाची शिक्षा, १९४२ च्या 'भारत छोडो' चळवळीत भूमिगत राहून त्यांनी केलेले कार्य, पुढे १९४६ ते १९७६ या तीस वर्षांच्या काळात राज्य व केंद्रपातळीवर अनेक खात्याचे मंत्री, १९७७ ते १९७९ या काळात विरोदी पक्षाचे नेते, १९७९ मध्ये चरणसिंगच्या मंत्रिमंडळात उपपंतप्रधान, १९८२ नंतर आठव्या भारतीय वित्त आयोगाचे अध्यक्ष या घटनांमुळे राजकारण हाच त्यांच्या जीवनातील महत्त्वाचा भाग बनला. राष्ट्रीयत्व, लोकशाही व समाजवाद या नेहरूंच्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर पडला. या राजकीय जीवनप्रवासात त्यांनी काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत आणि अरबी समुद्रापासन ते ब्रह्मपुत्रेच्या खो-यापर्यंतचा अभ्यास केला. या देशातील समाजजीवनाच्या प्रेरणा आणि आव्हाने पाहिली. देशाच्या प्रश्नांकडे डोळसपणे पाहिले. त्यामुळे राजकीय नेते, कार्यकर्ते हे डोळस असले पाहिजेत, त्यांच्याकडे समाजाच्या विकासाचा दृष्टिकोन असला पाहिजे. तो आंधळा असता कामा नये. आंधळा दुनियेत हिंडू शकेल पण आंधळ्याच्या मागे दुनिया जावू शकणार नाही असे कार्यकर्त्यांना त्यांनी आपल्या भाषणांतून मार्गदर्शन केले. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी, कार्यप्रवण करण्यासाठी, पक्षबांधणीसाठी विचारांची आणि मनांची देवाणघेवाण करण्यासाठी नेत्यांच्या मनात संशयाचे, संभ्रमाचे, संस्काराचे निर्माण झालेले प्रश्न दूर करण्यासाठी, मूलभूत तत्त्वांची त्यांना आठवण करून देण्यासाठी, विरोधकांच्या विषारी विचारांचा परामर्श घेण्यासाठी त्यांनी राजकीय भाषणांचा पुरेपूर उपयोग करून घेतला. या भाषणांतून राजकारणात न्यायनीती असली पाहिजे असा आग्रह ते नेहमी धरत.
यशवंतरावांनी आपल्या राजकीय कारकीर्दीत काँग्रेस पक्षाची संघटना मजबूत केली आणि कार्यकर्त्यांची एक बलशाली संघटना स्थापन केली. जागोजागी काँग्रेस शिबिरे घेतली. कार्यकर्त्यांना भाषणाच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे शिक्षण दिले. त्यांच्या भाषणांतून त्यांना वैचारिक अधिष्ठान प्राप्त करून दिले. काँग्रेस संघटना व शासन यांच्यामध्ये सुसंवाद घडवून आणण्यासाठी वक्तृत्वाचा त्यांना सदैव उपयोग झाला. तरुण पिढीला पुढे आणण्यासाठी त्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केला. यासाठी त्यांच्या प्रभावशाली वक्तव्यांचा त्यांना खूप उपयोग झाला. त्यांच्या या वक्तृत्वाची भाषा साधी, सरळ व सोपी हृदयाचा ठाव घेणारी असे. या कलेमुळे त्यांना श्रोत्यांची व कार्यकर्त्यांची उणीव कधी भासली नव्हती. अशा या लोकसंग्राहक नेत्याने अनेक राजकीय विषयांवर आपले मुक्त चिंतन प्रकट केले. 'जनप्रेमाची शक्ती', स्वप्नपूर्तीचा ऐतिहासिक क्षण', 'सोनियाचा दिवस', 'विधायक कर्तृत्वास आव्हान', 'लोकशाही राज्यकारभाराची कसोटी', 'कल्याणकारी राज्यातील कारभाराची कसोटी', 'कल्याणकारी राज्याची कल्पा', 'काँग्रेसची ऐतिहासिक भूमिका', 'आमच्या सामर्थ्याचे जीवनस्त्रोत', 'पक्षसंघटनेच्या बदलत्या दिशा', 'आर्थिक प्रश्नांचे राजकीय स्वरुप', 'राजकीय समस्यांचा चक्रव्यूह : शोध, वेध आणि भेद', 'राजकीय निर्णय आणि परिवर्तनाची प्रक्रिया', 'लोकमताचा कौल आणि त्याचा अर्थ', 'पक्षावर अभंगनिष्ठा', 'बांधीलकीचे राजकारण' यासारख्या कितीतरी भाषणांमधून त्यांनी मार्गदर्शन केले. या विविध भाषणांतून त्यांनी लोक, त्यांच्या गरजा, परंपरा, श्रद्धास्थाने, जीवन जगण्याची रीत, भावी जीवनाची स्वप्ने, लोकांच्या काळजाला हात घालून त्यांच्या मनावर बिंबवली ते म्हणतात, "जनता आणि नेता असे हे माता आणि पुत्र यांचे नाते आहे. जनता हीच शेवटी माता. तिच्या आशीर्वादातून, तिच्या सर्वस्वातून, तिच्या भावनेतून तिच्या परंपरेतून नेतृत्व राहते." अशा स्वरुपाचे नाते जनता आणि नेता यांच्यामध्ये असले पाहिजे असा विश्वास ते व्यक्त करतात. एवढेच नव्हे तर माणसांच्या मनाची मशागत करून त्यांच्या समोर आदर्श निर्माण करणे हीच नेतृत्वाची कसोटी आहे. नेतृत्व हा शब्दच व्यापक अर्थाचा आहे असे ते सांगत. वेगवेगळ्या क्षेत्रांतील विविध शास्त्रांत जे कोणी सामूहिक परिणाम घडवून जो आदर्श निर्माण करत असतील ते खरे नेते असे यशवंतराव म्हणतात किंवा ज्यावेळी अनेक मार्ग समोर असताना योग्य मार्गाने जो मुक्कामावर पोहोचू शकेल किंवा संभ्रम नाहीसा करण्याचा प्रयत्न करेल हे ज्याला समजेल तो नेता. म्हणून राजकारणामध्ये जबाबदारीने काम करण्याचा सल्ला ते कार्यकर्त्यांना देतात अशा या नेतृत्वाबद्दल ते सांगतात, "स्वातंत्र्य, मानवतेचे दु:ख आणि ज्ञानविज्ञानाचा प्रसार या आपल्या मूळ निष्ठा, मूळ प्रेरणा यांच्याशी कुठलीही जडजोड न करता त्याचा लोकजीवनामध्ये आचार घडवीत असताना करावे लागणारे फेरफार ज्या माणसाला समजतात त्याला मी नेता मानतो. " ७८ अशा स्वरुपाची नेत्याची व्याख्या ते करतात.