पुष्कळ वेळा माझ्या मनात येऊन जाते की पंडितजी काश्मिरी ब्राह्मणाच्या कुळात जन्माला येण्याऐवजी दक्षिणेतील एखाद्या राज्यात जन्माला आले असते तर? तर त्यांना गेली अनेक शतके अन्यायावर उभे असलेले निजामाचे राज्य हे दक्षिणेतील हिंदी मानवतेच्या हृदयात शलणारे एक शल्य आहे याची अनुभूती आली असती.
जनतेच्या अंतर्मनातील स्पंदने जेव्हा नेत्यांना समजेनाशी होतात तेव्हा जनताच नेतृत्त्व हाती घेते. भाषिक प्रांतरचनेच्या बाबतीत आमच्या देशात हे घडणार असे स्पष्ट दिसू लागले आहे.''
या नोंदीतील शेवटचा परिच्छेद फारच महत्त्वाचा आहे. यशवंतरावांच्या मनात पं. नेहरूंच्याबद्दल आदर होता, प्रेमही होते. त्यांचे नेतृत्त्व यशवंतरावांनी पूर्णतया स्वीकारले होते. परंतु पं. नेहरूंच्या वैचारिक भूमिकेतील कच्च्या दुव्यावर त्यांनी तेथे नेमके बोट ठेवले आहे. या नोंदीतील शेवटच्या दोन वाक्यातून यशवंतरावांची राजकीय दूरदृष्टी प्रत्ययास येते.
१६ जानेवारी १९५३ ची नोंदही अशीच महत्त्वाची आहे. ती पुढीलप्रमाणे –
ए. आय. सी. सी. प्रांताच्या पुनर्रचनेसंबंधीचा ठराव श्री. काका गाडगीळांनी मोडला. आंध्र निर्मितीनंतर त्या प्रयोगाचे 'स्टॅबिलायझेशन' झाल्यानंतर इतर प्रांतांचा विचार करावयाचा असे धोरण ठरावात नमूद करण्यात आले आहे.
मी ऍमेडमेंट पाठविण्याचे ठरविले. 'स्टॅबिलायझेशन' ऐवजी 'फॉर्मेशन' असा शब्द घालावा अशी साधी सरळ उपसूचना मी पाठविली. मी उपसूचना मांडल्यावर काही खुलाशानंतर ती काढून घेणार नाही असे मी गाडगीळ यांना स्वच्छ बजावले. मी थोडक्यात विषय मांडला. उपसूचना मताला टाकता अनुकूल ४१ मते विरुद्ध १०० मते पडून ती नापास झाली.
महाराष्ट्राच्या प्रतिनिधींमध्ये उपसूचनेचा चांगला परिणाम झाला असे दिसले. हैद्राबादचे देविसिंग चव्हाण (पुनर्वसन मंत्री) मुद्दाम दुसरे दिवशी घरी येऊन भेटून गेले. संयुक्त महाराष्ट्र निर्मितीची त्यांची तयारी दिसली.
राजकीय महत्त्वाच्या नोंदी बरोबर दोन अन्य नोंदी मला येथे घ्याव्याशा वाटतात. ३० जानेवारीच्या नोंदीत यशवंतरावंनी लिहिले आहे -
''राष्ट्रपित्याच्या महायात्रेचा आजचा दिवस. सुख आणि दु:ख यात अंतर किती असा प्रश्न विचारला तर त्याला हिंदी मनुष्य 'तीन दिवसाचे' असे उत्तर देऊ शकेल. २६ जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाच्या पाठोपाठ तीन दिवसांनी तीस जानेवारी हा उजाडतो. हा सुखदु:खाचा पाठशिवणीचा खेळ अखंड काळपर्यंत हिंदी जीवनात चालू राहणार.''