या १९५५ ते १९६० या कालखंडात महाराष्ट्रात ज्या राजकीय घटना घडल्या त्यासंबंधी यशवंतरावांनी राजकीय नोंदी केलेल्या नाहीत त्यामुळे रामभाऊ जोशी यांनी त्या सर्व राजकीय घटनांबद्दल विस्ताराने लिहिले आहे. नव्या पिढीतील वाचकांना समोर ठेऊन रामभाऊंनी हे लिहिले आहे हे मी समजू शकतो परंतु ते लेखन सूत्रमय झाले असते तर ते अधिक बरे झाले असते असे मला वाटते. महाद्विभाषिकाच्या निर्मितीच्या वेळी जे घडले आणि एकूणच संयुक्त महाराष्ट्राच्या प्रश्नासंबंधी भाऊसाहेब हिरे आणि यशवंतराव चव्हाण यांच्या भूमिकेतील फरक काय होता, यासंबंधी यशवंतरावांनीच लिहावयास पाहिजे होते या रामभाऊ जोशी यांच्या विचाराशी मी सहमत आहे.
१९५७च्या निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळाल्यानंतर यशवंतरावांनी मुख्यमंत्री म्हणून अत्यंत कुशलतेने काम केले. सर्व समावेशक भूमिका घेऊन विरोधी पक्षाला त्यांनी सन्मानाने वागविले. महाराष्ट्रातील जनतेला जास्तीत जास्त विशुद्ध, कार्यक्षम आणि नि:पक्षपाती कारभाराची अनुभूती या काळात आली आणि देशातले स्थिर व पुरोगामी राज्य अशी महाराष्ट्राची प्रतिमा निर्माण झाली. मुख्यमंत्री असताना यशवंतरावांना राजकीय नोंदी करण्यास फुरसत मिळणे शक्यच नव्हते. या काळातील घटनांचे विवेचन आणि विश्लेषण करणारे यशवंतरावांचे संकल्पित आत्मचरित्र लिहून झाले असते तर अनेक घटनांवर प्रकाश पडू शकला असता असे मला वाटते. १९६० मध्ये संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर यशवंतरावांनी विरोधी पक्षातील अनेक तरुण कार्यकर्त्यांना सत्तेत सहभाग देऊन महाराष्ट्राचा विकास साधण्याचे आवाहन केले. यशवंतराव मोहिते, मोहन धारिया यांच्यासारखे खंबीर विरोधकही काँग्रेसमध्ये गेले. १९५७ ते १९६२ या काळात यशवंतराव चव्हाण यांनी मुख्यमंत्री म्हणून जी कामगिरी केली तिच्यामुळे १९६२ च्या निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसला भरघोस यश मिळाले. या निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी यशवंतराव यांनी धोरणात्मक आखणी सुरू केली. आणि ६ नोव्हेंबरला अचानकपणे पं. नेहरूंनी दूरध्वनीवरून सांगितले की त्यांना संरक्षणमंत्री म्हणून दिल्लीमध्ये तत्काळ यावे लागणार आहे. त्यानंतर २१ नोव्हेंबरला दिल्लीत यशवंतरावांचा शपथविधी झाला.
संरक्षण मंत्री झाल्यानंतरच्या कालखंडातील दोन वैयक्तिक पत्रे या पुस्तकात आहेत. तेजपूर आणि जोरहाट येथून वेणूताईंना लिहिलेल्या या पत्रामध्ये त्या प्रदेशाचे, तेथील लोकांचे आणि हिमशिखरांचे वर्णन आहे.
६ जानेवारी १९६६ला ताश्कंदला पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या समवेत असताना यशवंतरावांनी केलेल्या नोंदीमध्ये प्रेसिडेंट आयुब आणि झुल्फिकार अलि भुत्तो यांच्यासंबंधी त्यांना काय वाटले ते कांही थोड्या वाक्यातच स्पष्टपणे मांडले आहे.
यशवंतरावांनी लिहिले आहे -
''प्रेसिडेंट आयुब आणि भुत्तो या दोन्ही व्यक्तींना मी प्रथमच भेटलो. प्रे. आयुबला व्यक्तिमत्त्व आहे. उंचापुरा पठाण, चेहेऱ्यावर नाटकी हास्य भरपूर, बोलणेही अघळपघळ आणि गोड. माणूस प्रामाणिक नाही असे वाटते. त्याच्या शब्दावर भरवसा ठेवणे अवघड - नव्हे धोक्याचे आहे. भुत्तोशी बोलण्याचा प्रसंग आला नव्हता. पहिले दोन दिवस थंड बसून होता. काल दुपारी पहिला सामना झाला. बोलण्या-वागण्यात करेक्ट होता. आपले म्हणणे स्पष्ट शब्दांत काही आडपडदा न ठेवता त्याने मांडले.''