संपूर्ण १९७५ सालांत त्यांन आठ वेळा परदेशांचे दौरे करून जगांतल्या मुत्सद्यांशी विविध प्रश्नांच्या संदर्भात वाटाघाटी केल्या. युगोस्लाव्हियाच्या भेटीनंतर १४ मार्चला ते गियाना, क्यूबाच्या दौ-यावर गेले. दोन आठवडे त्यांचा हा दौरा झाला. त्याच्या पुढच्या महिन्यांत ते जमेका, मेक्सिको इकडे २७ एप्रिलला रवाना झाले. या दोन ठिकाणच्या भेटीगाठी आणि चर्चा १४ मेपर्यंत सुरू राहिल्या. तेथून परत येतांच लगेच २७ मे रोजीं ते लेबॅनॉन, इजिप्तच्या भेटीसाठी गेले. पेरु-अमेरिकेचा त्यांचा दौरा असाच दोन आठवड्यांचा झाला. १८ ऑगस्टला ते 'पेरु'कडे रवाना झाले आणि २ सप्टेंबरला परतले; परंतु लगेच त्याच महिन्यांत २८ सप्टेंबरला ते युरोप-अमेरिकेच्या दौ-यावर पुन्हा रवाना झाले. त्या वर्षांतल्या अखेरच्या तीन महिन्यांत त्यांनी अफगाणिस्तान, इराक, कुवेत बहारिन, फ्रान्स या देशांना भेटी देऊन तेथील मुत्सद्यांशी चर्चा केली, संयुक्त राष्ट्रसंघाच्या बैठकीला उपस्थित राहून त्यानी भारताची बाजू समर्थपणें मांडली.
१९७६ मधील त्यांचं देशाटन नेपाळच्या दौ-यापासून सुरू झालं. १९ जानेवारी १९७६ ला त्यांनी नेपाळ-भेटीचं प्रस्थान ठेवलं आणि २२ जानेवारीपर्यंत नेपाळमधील मुत्सद्दी, नेपाळ-नरेश यांच्याशी चर्चा केल्या. त्यानंतर या वर्षांत त्यानी ३१ मार्चला तुर्कस्तानला भेट देऊन मध्यपूर्वंतील राष्ट्रांशी मैत्रीचे संबंध जोडण्याच्या कार्यास जोराची चालना दिली. १९७६ च्या मेअखेरीला त्यांनी अल्जेरियाचा दौरा पूर्ण केला. हे सारं देशाटन करतांना भारताच्या राजकीय संबंधाबरोबरच आर्थिक, उद्योग व व्यापारविषयक कराव्या लागल्या. स्नेह निर्माण करावा लागला. या सा-या आंतरराष्ट्रीय व्यवहारांतून यशवंतरावांनी भारताची आणि भारताच्या नेतृत्वाची एक आगळी, समर्थ प्रतिमा जागतिक राजकारणांत निर्माण केली.
विकसनशील राष्ट्रांच्या प्रश्नाबाबत सहानुभूतीचे दृष्टिकोन ठेवणारे यशवंतराव विकसित राष्ट्रांच्या व्यवहारांत आणि वागण्यांत. भारताच्या दृष्टीनं अनुकूल बदल घडावा यासाठी तर विशेष प्रयत्नशील राहिले. भारत-अमेरिका, भारत-रशिया, भारत व मध्यपूर्वेंतील राष्ट्रं, भारत-पाकिस्तान, भारत-बांगलादेश आणि भारत-चीन यांच्यातील राजनैतिक संबंध सुधारावेत आणि ते दीर्घकाळ टिकून रहावेत यासाठी अलिप्ततेचं आपलं धोरण कायम ठेवून ते वेगळ्या मुत्सद्देगिरीनं पावलं टाकत आहेत, असं आढळतं. अलिप्ततावादाप्रमाणेच शेजारी राष्ट्राशीं हार्दिक संबंध निर्माण करून समाजवादी देशांशी सहकार्य करणं हें आजच्या जागतिक प्रश्नांचा उलगडा होण्याच्या दृष्टीनं महत्त्वाची पराराष्ट्र-नीति ठरली आहे. अविकसित देशाशीं राजनैतिक आणि आर्थिक सहकार्य राखणं आणि साम्राज्यशाही, वसाहतवादी धोरणाविरुद्ध जी शक्ति असेल तिच्याशीं भागीदार असणं देशाच्या परराष्ट्र-नीतिमध्ये अनुस्यूत आहे. कारण जगांत शांतता नांदली पाहिजे हें भारताच्या परराष्ट्र-नीतीचं एक महत्त्वाचं सूत्र आहे.
पिंग-पॉंग खेळाडूंबरोबर चीनचे अधिकारी भारतांत आलेले असतांना भारताशी संबंध सुधारण्यास चीन तयार असल्याचं मत व्यक्त झालं. परंतु भारताला चीनशी मैत्रीचे संबंध हवे होते ते राजनैतिक पातळीवर निर्माण व्हायला हवे होते. खेळाच्या नव्हे.
चीनबरोबर मैत्री राखण्याचे विचार भारतानं पूर्वीच मान्य केलेले आहेत. चीननं १९६२ सालीं भारतावर आक्रमण केल्यानंतर हे विचार मागे पडले होते; परंतु जागतिक नव्या परिस्थितीच्या संदर्भात या उभय देशांतील मैत्रीला उजाळा देण्याची गरज लक्षांत घेऊन भारताच्या नेतृत्वानं त्या दिशेनं अलीकडेच सुरुवात केली आणि चीनकडूनहि त्याला आता प्रतिसाद मिळूं लागल्याचीं चिन्हं दिसूं लागलीं आहेत. भारत व चीन यांचे राजदूतावास एकमेकांच्या देशांत असल्यानं प्रत्यक्ष बोलणीं व अनुभव यावर भर द्यावा असं भारत सरकारचं या बाबतींत धोरण राहिलं. सुरुवातीला चीनकडून त्याला प्रतिसाद मिळाला नाही; परंतु स्वाभिमान राखून आणि राष्ट्रीय हितसंबंधांची जागरुकता ठेवून, भारताचं नेतृत्व प्रयत्नशील राहिलं. चीनकडून त्याला आता प्रतिसाद मिळत आहे.
यशवंतराव १९६२ सालीं दिल्लीला पोंचले ते चीनशीं युद्धभूमीवर सामना करण्यासाठी ! एक तपानंतर आता यशवंतरावांच्याच हातानं, या दोन देशांच्या मैत्रीची निरगाठ बसावी, अशी नियतीची योजना असल्यास नकळे ! कांही अनुकूल घड्याची प्रक्रिया मात्र सुरु झाली आहे. पंतप्रधान इंदिरा गांधी यांची पावलं त्या दृष्टीनं, मुत्सद्दीपणानं, स्वाभिमान शाबूत राखून पंडू लागलीं आहेत. यशवंतरावांची त्यांना दर्जेदार साथ आहे. राष्ट्राच्या आणि व्यक्तीच्या जीवनांत योगायोग म्हणतात तो हाच असावा.