विविधांगी व्यक्तिमत्व-२

याच ठिकाणी मला यशवंतरावजींच्या उदंड ग्रंथाभ्यासाची आणि साहित्याच्या विविध प्रकारांच्या ग्रंथसंग्रहाच्या छंदाची आठवण होते. कर्‍हाड येथे सौ. वेणूताई चव्हाण स्मारक पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट मध्ये संग्रहित केलेली यशवंतरावांची ग्रंथ-संपदा पाहण्याची संधी लाभलीच; पण सुरुवातीपासून त्या ग्रंथालयात ग्रंथपाल म्हणून काम करण्याचे श्रेयही मिळाले. त्या ग्रंथांच्या ग्रंथालय शास्त्राप्रमाणे नोंदी करताना असे आढळून आले की, त्यांचे वाचन केवळ मराठी किंवा इतर भारतीय भाषातील ग्रंथांपुरतेच सीमित नव्हते. तर इंग्रजीसह इतर प्रमुख भाषांतील किंवा इतर भाषातील इंग्रजीत अनुवादित झालेले ग्रंथ मला त्या संग्रहात आढळले. केवळ साहित्यावरच नव्हे तर विविध ज्ञानशाखातील ग्रंथ त्यांच्या संग्रही आहेत. त्यामध्ये काही त्यांनी मुद्दाम खरेदी केलेले व काही भेटीदाखल आलेले ग्रंथ आहेत. त्यांचे ग्रंथप्रेम केवळ महाराष्ट्रातील साहित्यिकांनाच नव्हे, तर इतर प्रांतातील प्रमुख साहित्यकारांना माहीत असल्यामुळे अनेक नामवंत साहित्यिकांनी त्यांना आपले ग्रंथ भेट म्हणून दिलेले आढळले. पण एवढयानेच त्यांची ग्रंथाभ्यासाची आस्था दिसून येते असे नाही. कारण आजच्या काळात कोणीही उच्चपदस्थ व्यक्तीच्या संग्रही बर्‍यापैकी ग्रंथसंग्रह असतो. परंतु यशवंतरावांचे वैशिष्टय हे की, त्यापैकी बहुतेक पुस्तके त्यांनी हाताळली आहेत. त्यावर त्यांनी टिपणं काढलेली आहेत. प्रसिद्ध साहित्यिकापासून अगदी नवोदित साहित्यिकापर्यंत सर्वांना आपले अभिप्राय स्वत:च्या हस्ताक्षरात त्यांनी कळविले आहेत. ही गोष्ट त्यांच्यासारख्या अनेक व्यापात असलेल्या व्यक्तीला, साहित्याविषयीचे नित्यचिंतन आणि आस्था यामुळेच शक्य झाले.

डॉ. भालचंद्र नेमाडे, ना. धों. महानोर, अरुण साधू यासारख्या वेगवेगळया प्रवृत्तींच्या साहित्यिकांवर त्यांनी आपले स्पष्ट अभिप्राय नोंदलेले आढळतात. 'सिंहासन,' 'मुंबई दिनांक' यासारख्या कादंबर्‍या माझ्या मनाची मुळीच पकड घेऊ शकत नाहीत हे जितक्या परखडपणे नोंदवितात. तसेच भालचंद्र नेमाडयांच्या 'कोसला' 'जरिला' 'झूल' यासारख्या कांदबर्‍या, अनिल अवचटांची 'माणसं' यासारखा लेखसंग्रह, लक्ष्मण माने यांचे 'उपरा' सारखे आत्मकथन वाचून आपण अस्वस्थ झाल्याची नोंद यशवंतराव करतात 'विदेश-दर्शन' या पत्ररूप प्रवासवर्णनात देशोदेशीच्या प्रवासामध्ये आढळलेल्या नवीन ग्रंथांचा, नाटयप्रयोगांचा, संगीत नृत्य वगैरे विषयांचा व कार्यक्रमांचा उल्लेख वर्णनाच्या ओघात सहज आलेला दिसतो. यावरून साहित्य, संस्कृती व कला याविषयीच्या ग्रंथसंग्रहाचा भाग हा त्यांच्यापुरता प्रदर्शनाचा भाग नसून त्यांच्या व्यक्तिमत्वाला ताजे राखणार्‍या व जीवनरस देणार्‍या एका आंतरिक ऊर्मीचाच भाग आहे असे म्हणावेसे वाटते.

'यशवंतराव चव्हाण ही एक व्यक्ती नसून तो एक विचार आहे' असे जेव्हा म्हटले जाते तेव्हा ती निव्वळ अलंकारिक भाषा नसते, तर महाराष्ट्रातील सामाजिक परिवर्तनाच्या दृष्टीने फुले, शाहू महाराज, विठ्ठल रामजी शिंदे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेला विकसित करण्याचे कार्य ती आपल्यासमोर उभी करते. सत्तास्थानी राहून या विचारांना व्यावहारिक पाया मिळवून देण्याचे अवघड कार्य यशंवतरावांनी केले. याबाबत त्यांनी, कसलीही कठोर भूमिका न घेता, नेहमीच समन्वयाची व आत्मशोधनाची भूमिका घेतलेली दिसून येते. संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर नागपूरच्या दैनिक 'तरुण भारत' ने त्यावेळी निर्माण केलेला एक वाद गाजला होता. महाराष्ट्र राज्याची निर्मिती कोणासाठी? हे राज्य मराठयांसाठी की मराठी माणसांसाठी, असा प्रश्न कै. ग. त्र्यं. माडखोलकरांनी विचारला होता. या वादाला यशवंतरावांनी संयमाने व कृतीने उत्तर दिले. महाराष्ट्रात गांधी खुनाच्या वेळी झालेल्या आर्थिक नुकसानी झालेल्यांची जळीत कर्जे त्यांनी माफ केली. महाराष्ट्र राज्यात रिपब्लिकन पक्षाबरोबर काँग्रेस पक्षाने समझोता केला. मागास जाती - जमातींसाठी असलेल्या सवलती नवबौध्दांनाही दिल्या. आर्थिकदृष्टया मागासलेल्या समाजातील मुलांना शैक्षणिक सवलती दिल्या. महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून त्यांनी केलेल्या प्रत्यक्ष कृतीपैकी ही काही उदाहरणे. ही प्रागतिक पावले प्रथम महाराष्ट्रात उचलली गेली. यशवंतरावांच्या सामाजिक दृष्टिकोनाचा तो परिपाक होता.