• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

भाग १ विधानसभेतील भाषणे-१०९

मी आताच सांगितल्याप्रमाणे पोलिस संघटनेमध्ये ट्रेड युनियन स्पिरिट चालू देणार नाही. आम्ही यासंबंधी गंभीर आणि स्वच्छ भूमिका जाहीर केली नाही तर आम्ही आमच्या कर्तव्याला चुकू आणि म्हणूनच आज मी यासंबंधी स्वच्छ भूमिका मांडू इच्छितो. विरोधी पक्षाच्या सन्माननीय सभासदांनी जो प्रश्न उपस्थित केला तो निव्वळ या संघटनेची सहानुभूती मिळविण्याच्या दृष्टीने केला आहे असे मी म्हणत नाही. तरी पण मी त्यांना सांगेन की, आपल्या राज्यात पोलिसांना मिळणारा पगार आणि महागाई भत्ता आणि इतर राज्यात मिळणारा पगार आणि महागाई भत्ता याची त्यांनी तुलना केली तर त्यांना असे दिसून येईल की, आपल्या राज्यात मिळणारा पगार आणि भत्ता कितीतरी जास्त आहे. तेव्हा त्यांना जास्त पगार दिला पाहिजे असे म्हणणे बरोबर नाही. तरीही आम्ही त्यांना जास्तीत जास्त पगार आणि सवलती देण्याचा प्रयत्न करतो आहोत. आम्हालाही पोलिसांच्या दुःखाची कल्पना आहे. या प्रसंगी मला जाहीरपणाने सांगावयाचे आहे की, राज्यातील पोलिस फोर्स कोणत्याही राजकीय संघटनेच्या प्रभावापासून प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे दूर ठेवावयाचा आहे आणि तसे जर आम्ही केले नाही तर ज्या लोकशाही मूल्यांची आपण जोपासना करू इच्छितो ते काही आपल्या हातून होणार नाही. ही एका पक्षाची जबाबदारी नाही तर सर्व सभागृहाची आहे.

असा प्रश्न विचारण्यात आला की, पोलिसांच्या बायकांचा जो मोर्चा आला होता त्याला भेट का दिली नाही? त्याचप्रमाणे आज असाही प्रश्न निर्माण करण्यात आला होता की, कलेक्टरला मोर्चाला भेटण्याची परवानगी नाही, तेव्हा त्याला लोकांचे गार्‍हाणे कसे कळणार? यासंबंधी मी खुलासा करू इच्छितो की, कलेक्टरला जाऊन भेटण्याची मनाई नाही, परंतु कलेक्टरने ह्या लोकांना बाहेर येऊनच भेटले पाहिजे असा आग्रह का?

अध्यक्ष महाराज, पोलिसांच्या बायकांचा जो मोर्चा काही दिवसांपूर्वी निघाला होता त्याच्या प्रतिनिधींची मी भेट घेतली नाही अशी टीका माझ्यावर या ठिकाणी करण्यात आली. ही टीका तर निराधार आहेच परंतु या बाबतीत वस्तुस्थितीचा विपर्यास करण्यात येत आहे असे मला सांगावयाचे आहे. अध्यक्ष महाराज, पोलिसांच्या स्त्रिया आपली गार्‍हाणी घेऊन मला भेटावयास आल्या तर त्यांना एकदाच काय परंतु दहादा भेटण्यास मी तयार आहे आणि तयार होतो, परंतु त्यांचे प्रतिनिधित्व करण्याच्या निमित्ताने आलेल्या तथाकथित पुढार्‍याची भेट घेण्यास मात्र मी तयार झालो नाही आणि होणार नाही. मला या ठिकाणी ही गोष्ट आग्रहपूर्वक सांगावयाची आहे की, कोणत्याही पक्षाचे लोक, मग ते माझ्या पक्षाचे लोक का असेनात, अशा प्रकारे लोकांच्या गार्‍हाण्यांचा फायदा घेऊन आपले पुढारीपण दाखवू लागले किंवा त्या गार्‍हाण्यांचा आपल्या पक्षीय फायद्याकरिता उपयोग करू लागले तर ते मला कधीही सहन होणार नाही आणि त्याला उत्तेजन माझ्याकडून मिळणे शक्य नाही. पोलिसांच्या स्त्रिया आपल्या कुटुंबातील अडचणी सांगण्याकरिता मला भेटण्यास आल्या तर एकदाच काय अनेकदा त्यांची भेट घेण्यास मी तयार आहे आणि अशा प्रकारचा निरोपही मी त्या दिवशी पाठविला होता.

अध्यक्ष महाराज, या ठिकाणी चर्चेच्या ओघात असा एक आरोप करण्यात आला की, सत्ताधारी पक्षाचे स्थानिक कार्यकर्ते पोलिसांवर वजन आणून त्यांच्या कार्यवाहीवर आपला प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करतात जेणेकरून निरपराध लोकांना त्रास होतो. अध्यक्ष महाराज, पोलिसांवर असे वजन आणण्याचा प्रयत्न राजकीय कार्यकर्त्यांकडून होतच नसेल असे मला म्हणावयाचे नाही.