३०
पोलीस प्रशासनावरील चर्चा* (२ जुलै १९६२)
------------------------------------------------------
पोलीस प्रशासनावर खर्च का वाढला आहे याची कारणे सांगून पोलीस खात्यातील भ्रष्टाचाराला त्यांचे वेतन वाढवूनच आळा घालता येईल असे मा. श्री. चव्हाण यांनी प्रतिपादन केले.
------------------------------------------------------------------
*Maharashtra Legislative Assembly Debates, Vol VII, Part II (Inside No. 8), 3rd July 1962, pp. 889 to 890.
अध्यक्ष महाराज, या सभागृहातील पोलिसांच्या मागणीवरील चर्चा नेहमीच उदबोधक स्वरूपाची होत असते आणि सरकारला आपले धोरण ठरविण्याच्या बाबतीत काही अंशी मार्गदर्शकही ठरत असते. आजची चर्चा अशाच प्रकारे मार्गदर्शक ठरेल असे मी धरून चालतो. सन्माननीय सभासद श्री. पाटकर यांनी अनेक महत्त्वाचे प्रश्न या चर्चेच्या अनुरोधाने उपस्थित केलेले आहेत आणि बहुशः त्यावरच या सभागृहात दोन-अडीच तास चर्चा झाली. दोन-तीन महत्त्वाच्या मुद्यांच्या बाबतीत मी या ठिकाणी चर्चा करणार आहे, या सभागृहात काही तपशिलाच्या गोष्टींचाही उल्लेख करण्यात आलेला आहे, या तपशिलाच्या गोष्टींना उत्तर देण्याची माझी इच्छा असूनही मला ते शक्य होणार नाही. तपशिलवार सांगण्यात आलेल्या सर्वच गोष्टींची माहिती सध्या माझ्याजवळ असेलच असे म्हणता येणार नसल्याने मी त्याबाबतीत काही बोलावयाचे म्हटले तर संबंधित लोकांवर काहीसा अन्याय होण्याचा संभव असल्याने मी तपशिलाच्या गोष्टीत जाणार नाही. या ठिकाणी उपस्थित करण्यात आलेल्या महत्त्वाच्या मुद्यांवरच मी आपले विचार व्यक्त करणार आहे. पोलिस खात्याच्या कारभाराबाबत जे सामान्य प्रश्न उपस्थित करण्यात आलेले आहेत त्याबाबत सरकारचे धोरण काय आहे, सरकारचा विचार काय आहे याचे या सभागृहात स्पष्टीकरण झाले तर ते सभागृहाला, जनतेला आणि पोलिस खात्यालाही उपयोगी पडेल असे मला वाटत असल्याने काही महत्त्वाच्या मुद्यांना मी जरूर उत्तर देणार आहे.
सुरुवातीलाच सन्माननीय सभासद श्री. पाटकर यांनी एक प्रश्न अधिक तीव्रतेने मांडला आणि पोलिस खात्यात हे काय चालले आहे अशी विचारणा केली. पोलिसांची संख्या वाढलेली आहे, खर्च वाढलेला आहे परंतु त्या प्रमाणात गुन्हेही वाढलेले आहेत, दुप्पट झाले आहेत असे त्यांनी सांगितले. या दोन्ही गोष्टींचा परस्परांशी काही संबंध आहे किंवा नाही असा साधारण प्रश्न त्यांनी उपस्थित केला.