संयुक्त महाराष्ट्राचे शिल्पकार
मा. यशवंतराव चव्हाण हा मराठी मनांचा मानबिंदू. संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री. महाराष्ट्राच्या कृषी व औद्योगिक विकासाचा पाया घालणारा, महाराष्ट्रात सहकाराचे जाळे विणणारा आणि पंचायत राज्याच्या माध्यमातून तळागाळातल्या समाजाला त्याच्या लोकशाही ताकदीचे भान देणारा हा द्रष्टा नेता. २५ नोव्हेंबर, १९८४ रोजी मा. यशवंतरावांच्या मृत्यूनंतर त्यांचे हे कार्य पूर्णत्वास नेण्यासाठी यशवंतरावांचे अनुयायी, सुहृद व कार्यकर्ते एकत्र आले. त्यातूनच १७ सप्टेंबर, १९८५ रोजी मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटरची स्थापना झाली. यशवंतराव चव्हाण सेंटर हे पक्षनिरपेक्ष व्यासपीठ आहे. महाराष्ट्राच्या जनमानसाला सचिंत करणा-या प्रश्नांचा खल करावा आणि या चर्चेतून कार्य करणारी माणसे तयार व्हावीत ही सेंटरची भूमिका आहे. या राकट, कणखर, दगडांच्या देशाचा स्वाभिमान अभंग राहावा ही महाराष्ट्रातील जनमानसाची इच्छा आहे. यशवंतराव चव्हाण सेंटरचा प्रवास हा या आकांक्षेच्या पूर्ततेचा आहे.
यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षनिमित्ताने https://www.ybchavan.in यशवंतराव चव्हाण याचे समग्र संदर्भ साहित्य चे संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली आहे.