TOP HEADER
   
 • 001_Krishnakath.jpg
 • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
 • 003_Shabdhanche.jpg
 • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
 • 005_Saheb_14.jpg
 • 006_Yashodhan_76.jpg
 • 007_Yashodharshan.jpg
 • 008_Yashwant-Chintanik.jpg
 • 009_Kartrutva.jpg
 • 010_Maulik-Vichar.jpg
 • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
 • 012_Sahyadricheware.jpg
 • 013_Runanubandh.jpg
 • 014_Bhumika.jpg
 • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
 • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
 • Debacle-to-Revival-1.jpg
 • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
 • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
 • sing_3.jpg
   
   

१९ यशवंतराव चव्हाण : मराठी मातीचे वैभव

प्रा. उत्तम सूर्यवंशी

आधुनिक महाराष्ट्राची निर्मिती करणारे आणि या महाराष्ट्राला प्रगतिपथावर नेऊन सोडणारे यशवंतरावजी चव्हाण मराठी मातीचे वैभव होते.  भारताच्या पंतप्रधान इंदिराजी यांच्या अकल्पित व अमानुष हत्येनंतर २५ दिवसांतच यशवंतरावजींनी इहलोकीची यात्रा संपवली.  त्यांच्या जाण्याने आजही जी पोकळी निर्माण झाली आहे ती भरून निघणे कठीण आहे.  छत्रपती शिवाजी महाराज व लोकमान्य टिळकांनंतर एवढा मोठा महापुरुष महाराष्ट्राने पाहिला नाही.  राजकारण, समाजकारण, अर्थकारण, सहकार, शिक्षण, तंत्रज्ञान, शेती, साहित्य, संस्कृती, वाङ्मय व कला इत्यादींच्या त्यांनी लावलेल्या रोपट्यांचे पुढे वटवृक्षात रूपांतर झाले आणि ते महाराष्ट्राच्या जीवनाचे एक अविभाज्य अंग बनले.  यशवंतरावजींनी महाराष्ट्रातील नाटक, साहित्य व कलेला रसिकतेने आणि मायेच्या ममतेने जोपासले.  त्यांनी कर्तबगार माणसांना संधी देऊन त्यांच्या जीवनाचे सोने केले.  यशवंतरावजी म्हणजे महाराष्ट्र आणि महाराष्ट्र म्हणजे यशवंतराव असे जणू समीकरण झाले होते.  

यशवंतरावजींनी अनेक क्षेत्रांत अतुलनीय कामगिरी बजावली पण या सर्व कामगिरीमध्ये मला जी महत्त्वाची कामगिरी वाटते ती म्हणजे त्यांनी केलेले ग्रामीण जीवनाचे परिवर्तन.  त्यांचा पिंड तात्कालिक फायद्यासाठी लपंडाव खेळणा-या राजकारण्याचा नव्हता.  त्यांनी जे परिवर्तन घडवून आणले ते समाजहितासाठी व तळागाळातल्या माणसासाठी.  त्यांनी केलेले परिवर्तन दूरदृष्टीचे द्योतक आहे.  ते स्वतः लोकशाहीचे पुरस्कर्ते होते म्हणूनच त्यांनी लोकशाहीची विधायक चळवळ झोपडपट्टीपर्यंत नेऊन पोहोचविली.  ''सामान्य माणूस सत्तेवर बसला हीच खरी लोकशाही'' असे ते म्हणत, आणि ते प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांनी जिद्दीने प्रयत्न केले.  आज महाराष्ट्रातील राजकारणात व समाजकारणात जी मंडळी अग्रेसर आहेत ती यशवंतरावजींनी महाराष्ट्राला दिलेली कायमची ठेव आहे.  श्री. वसंतदादा पाटील, श्री. शिवाजीराव पाटील निलंगेकर, श्री. शंकररावजी चव्हाण, मा. शरद पवार, श्री. माणिकराव पालोदकर, श्री. सुशीलकुमार शिंदे, रत्नाप्पा कुंभार, माधवराव बागल, दादासाहेब रूपवते, मधुकररावजी चौधरी, पद्मश्री शामरावजी कदम इ. कर्तृत्ववान माणसे यशवंतरावांनी घडविली.  त्यांच्या कर्तृत्वाला संधी प्राप्त करून दिली.  यशवंतरावांनी माणसे बांधली, जोपासली, वाढवली आणि त्यांच्या मनाला आकार दिला.  स्वकर्तृत्वावर उभे राहण्याचे सामर्थ्य दिले.  या अर्थाने यशवंतराव म्हणजे महाराष्ट्राला लाभलेली संजीवनी होती.  महाराष्ट्रातील शेतक-यांच्या व कष्टक-यांच्या मुलाला नांगरावरून सत्तेत नेऊन बसविणारे ते एक युगपुरुष होते.  महाराष्ट्रात पंचायत राज्याची स्थापना करून जबाबदारीचे विकेंद्रीकरण घडवून आणले.  जि.प., सहकारी बँका, सहकारी साखर कारखाने व सहकारी तत्त्वावर चालणारे निरनिराळे उद्योग ही यशवंतरावांनी महाराष्ट्राला दिलेली देणगी आहे.  पद्मश्री कै. विठ्ठलराव विखे पाटील यांनी भारतात पहिल्यांदा सहकारी साखर कारखान्याची मुहूर्तमेढ रोवली.  त्यांना यशवंतरावजींनी प्रोत्साहन देऊन नगर जिल्ह्यातील उजाड वाळवंटाचे हिरव्यागार रानात रूपांतर केले.  त्यांनी ख-या अर्थाने ग्रामीण अर्थव्यवस्थेचा पाया रचला.  सहकारी चळवळीमुळे ग्रामीण महाराष्ट्राचा कायापालट झाला आहे.  या चळवळीत काही वाईट अपप्रवृत्ती शिरल्या आहेत, नाही असे नाही; पण त्यामुळे सबंध चळवळच टाकाऊ आहे, असे म्हणणे गैरलागू आहे.

स्वातंत्र्योत्तर भारतात आर्थिक व सामाजिक परिवर्तन घडवून आणण्याचा काँग्रेस पक्षाने फार मोठा प्रयत्न केला.  पण या प्रयत्नाला यशाची फळे जर कुठे लागली असतील तर ती या महाराष्ट्रात.  आजही बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, ओरिसा या प्रांतात सरंजामदारी व जमीनदारी दिसते.  तेथे वेठबिगारी पद्धतीचे संपूर्ण निर्मूलन झाले नाही.  दलितांवरील अत्याचार दिवसेंदिवस वाढत आहेत.  राजकीय व सामाजिक लोकशाहीचे मोकळे वारे मोकाट गुंडगिरीमुळे सामान्यापर्यंत पोहोचत नाही.  आर्थिक व सामाजिक समता तर अजून खूप दूर आहे.  या तुलनेत महाराष्ट्र एकदम उठून वेगळा दिसतो.  महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, आगरकर, लो. टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा थोर वारसा आपल्याला लाभला आहे.  त्यामुळे येथील ग्रामीण समाजात स्वत्वाची भावना निर्माण झाली आहे.  यशवंतरावजींनी हाती आलेल्या सत्तेचा वापर, स्वावलंबी व स्वाभिमानी ग्रामीण संस्कृती टिकविण्यासाठी केला.  महाराष्ट्राच्या विकासासाठी शेती, मनुष्यबळ, नागरीकरण व उद्योगीकरण हे प्रश्न त्यांनी महत्त्वाचे मानले.  केवळ जमीनविषयक सुधारणा करून सामाजिक व आर्थिक समस्या सुटणा-या नाहीत.  शेतीची उत्पादनक्षमता व उत्पादन वाढवीत असताना सामाजिक दृष्टिकोण पुढे ठेवला पाहिजे, त्या दृष्टीने त्यांनी कृषिउद्योगाला चालना दिली.  १९५६ च्या अगोदर शेतकरी, मजूर, दलित, शोषित व आदिवासी मुलांना शिक्षण देणे दुरापास्त होते.  आजही थोड्याफार फरकाने हीच स्थिती आंध्र, तामिळनाडू, बिहार, ओरिसामध्ये आहे पण यशवंतरावजींनी आर्थिक दुर्बल घटकांसाठी शैक्षणिक सवलती उपलब्ध करून देऊन शिक्षणाची दारे सर्वांसाठी खुली केली.  त्यामुळे महाराष्ट्रात शिक्षणाचा वेगाने प्रसार झाला.

   

मराठी पुस्तके  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१५ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .