TOP HEADER
   
 • 001_Krishnakath.jpg
 • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
 • 003_Shabdhanche.jpg
 • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
 • 005_Saheb_14.jpg
 • 006_Yashodhan_76.jpg
 • 007_Yashodharshan.jpg
 • 008_Yashwant-Chintanik.jpg
 • 009_Kartrutva.jpg
 • 010_Maulik-Vichar.jpg
 • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
 • 012_Sahyadricheware.jpg
 • 013_Runanubandh.jpg
 • 014_Bhumika.jpg
 • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
 • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
 • Debacle-to-Revival-1.jpg
 • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
 • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
 • sing_3.jpg
   
   

प्रकरण ८ - प्रासंगिक लेखन

यशवंतरावांनी अशा स्वरूपाचे लेखन वृत्तपत्रांतन व मासिकांतून केले आहे. काही मुलाखतीच्या आधारेही या स्वरूपाची लेखन निर्मिती झाली आहे. त्यामुळे या लेखनाचे वाङ्मयीन रुप फार भिन्न स्वरुपाचे आहे. हे लेखन वेगवेगळ्या कारणांनी आणि वेगवेगळ्या वेळी लिहिले आहे. त्यामुळे या सा-या लेखनाचा पोत एकसारखा नाही. या लेखनामागील प्रेरणा व त्यांना लाभलेले कलात्मक स्वरूप हे प्रामुख्याने स्फुट स्वरुपाचे आहे. त्यांचे जीवन, त्यांचे साहित्यिक स्वरूप, त्यांच्या राजकीय प्रेरणा, त्यांची सामाजिक परिवर्तनाची भूमिका, देशाभिमान, राजकीय आकांक्षा, त्यांचा ध्येयवाद इत्यादी गोष्टींचा उलगडा अशा स्वरूपाच्या लेखनातून होतो. त्यांच्या जीवनाचा भव्य पट उलगडून दाखविण्याचाही काही अंशी प्रयत्न त्यांनी केला आहे. प्रासंगिक लेखनातून फक्त भावनात्मक परिणाम साधणे हे त्यांचे प्रयोजन न राहता, तत्कालीन युगांच्या जाणिवा व्यक्त करण्याचा समाजमनाचा हुंकार सांगण्याचा त्यांचा प्रांजळ प्रयत्न दिसतो. जीवनातील ओंगळ आणि मंगल प्रसंगाचा पट उलगडत असताना जो अनुभव आला तोच त्यांनी शब्दांकित केला आहे. या लेखनाचा निर्माता स्वत: लेखकच असल्याने त्यांच्या व्यक्तिमत्वाचे किंवा आयुष्याचे ठसे या स्वरुपाच्या साहित्यकृतीम्ये उमटण्याची प्रक्रिया सहजच होते. या लेखननिर्मितीसाठी ज्या अनेकविध घटकांचा त्यांनी उपयोग केला आहे, त्यामध्ये त्यांच्या आयुष्यातील घटना-प्रसंगांचा, व्यक्तींचा, त्यांच्या सभोवतालच्या परिसराचा समावेश आहे. थोडक्यात त्यांच्या अनुभव विश्वाच्या उभारणीमध्ये ज्या घटकांचा उपयोग झाला त्याचा या लेखन निर्मितीशी अतूट संबंध दिसतो. त्यामुळे याचेही ठसे या लेखननिर्मितीवर उमटलेले दिसतात.

यशवंतरावांच्या प्रासंगिक लेखनातही विविधता दिसते. शिवाय वकिली बाणाही जाणवतो. या वकिली बाण्याच्या मागे खंबीर वास्तवतेची बैठक होती. त्यामुळे आपले म्हणणे निर्भिडपणे मांडणे, ज्या क्षणाला जसे वाटते तसे मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केला. या लेखनातून साहित्यविषयक व समाजविषयक, स्वातंत्र्यविषयक, अशा नानाविध प्रश्नांचा किती सूक्ष्म रीतीने यशवंतरावांनी विचार केला होता. हे त्यांच्या पुढील काही लेखनावरून स्पष्ट होते. 'वर्गसंघर्ष आणि जातिसंघर्ष' ( तरुण भारत, नागपूर येथील १९७० दिवाळी अंक ) 'पक्षावरील अभंग निष्ठा ( केसरी १२ नोव्हेबर १९७७ ) 'भारतीय लोकशाही एक भविष्यकथा ( किर्लोस्कर जानेवारी १९७० ), भारताची सद्यस्थिती एक चिंतन ( केसरी १९६८ दिवाळी अंक ), 'केंद्र राज्य संबंधावरील दृष्टिक्षेप ( माणूस दिवाळी अंक १९६८ ), 'संयुक्त महाराष्ट्राचे साध्य' ( केसरी, प्रजासत्ताक संयुक्त महाराष्ट्र विशेषांक ), 'आजच्या राजकारणातील माझी भूमिका ( केसरी दीपावली पुरवणी, पुणे १९७७ ), 'नव्या प्रेरणांना साथ देऊ या, ( नवे जग किर्लोस्करवाडी मासिकातील लेख १९६२) 'काही संस्मरणीय वाढदिवस' ( पुणे, रविवार केसरी १० मार्च १९७४ ) 'केल्याने देशाटन', ( पुणे, केसरी दिवाळी विशेषांक १९७५ ), 'मंगल कलश' ( मुंबई, महाराष्ट्र टाईम्स दिवाळी वार्षिक १९७८ ) अशा असंख्य संकीर्ण लेखाचा नामनिर्देश करण्यासारखा आहे. त्यांचे हे लेखन सर्वार्थाने महत्त्वाचे आहे. या लेखांतून साहित्य, स्वातंत्र्यसंग्राम, जीवन, राजकारण, पक्षनिष्ठा यासारख्या विषयांवर लेख आहेत. या सर्वांना न्याय देणारे विवेचन करणे असाध्य आहे. मात्र या लेखांतून जाणवणारी एक महत्त्वाची गोष्ट ही की, हे सर्व प्रासंगिक लेख मानवी जीवनाशी असलेले संबंध स्पष्ट करणारे आहेत.

यशवंतरावांचे प्रासंगिक लेखन नियतकालिकांतून, दिवाळी अंक, पुरवण्या व वृत्तपत्रांतून आलेले आहेत. त्यांच्या या लेखांत व्यक्तिचित्रे, विविध अनुभवातून आलेले विचार, विविध विषयांना स्पर्श करणारे लिखाण इ. चे प्रतिबिंब उमटले आहे. या लेखनाला साचेबंद स्वरुप न देता त्यांनी मुक्तपणे लेखन केले आहे. कुठलेही बंधन त्यावर नाही. त्यात विविधता आहे. व्यक्तिचित्रणात्मक लेख वृत्तपत्रीय सदरातून लिहिलेले स्फूट लेख काही आठवणवजा लिखाण तर काही निरनिराळ्या विषयांवरचे मुक्त चिंतनपर लेख अशा प्रकार त्यांच्या प्रासंगिक लेखनाचे वर्गीकरण करता येईल.

   

मराठी पुस्तके  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१५ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .