TOP HEADER
   
 • 001_Krishnakath.jpg
 • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
 • 003_Shabdhanche.jpg
 • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
 • 005_Saheb_14.jpg
 • 006_Yashodhan_76.jpg
 • 007_Yashodharshan.jpg
 • 008_Yashwant-Chintanik.jpg
 • 009_Kartrutva.jpg
 • 010_Maulik-Vichar.jpg
 • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
 • 012_Sahyadricheware.jpg
 • 013_Runanubandh.jpg
 • 014_Bhumika.jpg
 • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
 • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
 • Debacle-to-Revival-1.jpg
 • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
 • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
 • sing_3.jpg
   
   

साहित्याचे सामर्थ्य

यशवंतराव चव्हाणांनी जीवनवादी पक्षाचीच बाजू मांडली आहे. ही बाजू मांडताना साहित्याच्या सामर्थ्याचा मोठ्या आत्मविश्वासाने त्यांनी पुरस्कार केला आहे. कारण साहित्य हे एक सामर्थ्य आहे. व्यक्तीच्या जीवनाप्रमाणेच राष्ट्राच्या जीवनात जी आव्हाने येतात ती आव्हाने झेलण्याचे सामर्थ्य जेव्हा प्रत्यक्ष अनुभवाला येते तेव्हा राष्ट्र मोठे होते असा आतापर्यंतचा अनुभव आहे. पण हे सामर्थ्य कशाने प्राप्त होते ? हे सामर्थ्य शास्त्राने प्राप्त होत नाही. बंदुकीच्या गोळीने प्राप्त होत नाही. हे सामर्थ्य विचारांतून येते. संस्कारातून येते हे विचार आणि हे संस्कार देण्याचे काम भाषेमार्फत, साहित्यामार्फत घडते म्हणून साहित्याचे मोल जास्त आहे असे मी मानतो. अशी साहित्याच्या सामर्थ्याबाबत यशवंतरावांची ठाम भूमिका होती. जीवनाच्या प्रतिकूल परिस्थितीशी झगडणा-या बहुजन समाजाच्या व्यथा व्यक्त करणारे साहित्य निर्माण झाले पाहिजे, अशी अपेक्षाही ते व्यक्त करतात. साहित्य, वाङ्मयाचा सामान्य माणसाला उपयोग झाला पाहिजे. जीवनात रोज झगडणा-या माणसाच्या अंत:करणात चैतन्य निर्माण करून त्याला समाधान देणे हे वाङ्मयाचे कार्य आहे. असा त्यांचा आशावाद होता. साहित्याच्याच सामर्थ्याचा देशाच्या आणि समाजाच्या प्रगतीसाठी उपयोग करून घ्यावा असे चव्हाणांना वाटते. 'मराठीचे सर्व संग्राह स्वरुप' या लेखात ते लिहितात "साहित्याचा समाजजीवनासाठी आरशासारखा उपयोग होतो. कारण या साहित्यात सर्वसाधारण लोकांच्या सांस्कृतिक, आर्थिक आणि सामाजिक प्रकृतीचे प्रतिबिंब सापडते. यातच साहित्याच्या उत्पत्तीचे व जनतेच्या अभिव्यक्तीचे रहस्य दडलेले आहे हे असे सत्य आहे की ज्याला समस्त मानवी इतिहासाचा पुरावा देता येईल. यावरून यशवंतरावाच्या साहित्याची संस्कारक्षमता व शब्दकारण लक्षात येते. त्यांचे भाषेवर अतोनात  प्रेम होते. शब्दांच्या सामर्थ्यांवर व सौंदर्यावर त्यांनी अनेक ठिकाणी विश्वास व्यक्त केला आहे. "शब्दांचे सामर्थ्य फार आहे. मी शब्दांना फार मानतो. त्यांच्यात अस्त्रांचे सामर्थ्य आहे. तसेच प्रकाशाचे तेज आहे. एखादा शब्द कोणी अशा वेळी उच्चारतो की त्यामध्ये एक विलक्षण सामर्थ्य येते. साहित्य हे समाजाला शिक्षित करण्याचे समर्थ साधन आहे. साहित्य हे मानवी जीवनाशी निगडित आहे. साहित्य हा मानवी संस्कृतीचा एक अविभाज्य घटक आहे. साहित्याचा समाजाच्या स्थितिगतीशी साक्षात संबंध असतो. साहित्य हे संस्कृतीचे संरक्षण करते तसेच संस्कृतीचे संवर्धन करते. " नवनिर्मितीचे सर्जनशील कार्य जसे शब्द करतात तसेच साम्राज्यशक्ती धुळीला मिळविण्याचे संहारक सामर्थ्यही शब्दांत आहे. कल्पना, विचार आणि शब्द यांचा त्रिवेणी संगम ही मानवी इतिहासातील एक जबरदस्त शक्ती आहे. एके ठिकाणी साहित्याबाबत अत्रे असे विचार व्यक्त करतात, "देशाच्या घटनेचे आणि प्रगतीचे वाङ्मय एक प्रभावशील शस्त्र आहे. जीवनाची जी चिरंतन मूल्ये आज मानवजातीच्या प्रगतिपथावर ध्रुवता-याप्रमाणे अटळ तेजाने तळपत आहेत ती मूल्ये आणि सत्ये ही मानवजातीला साहित्याने दिलेली लेणी आहेत. सैन्य आणि आरमार फार झाले तर जिवंत राष्ट्राचे रक्षण करू शकेल. पण राष्ट्राला जिवंत ठेवण्याचे काम केवळ साहित्यच करू शकते. राष्ट्राच्या पौरुषाच्या आणि पराक्रमाच्या परंपरा जिवंत राखून त्याग, ध्येय आणि शौर्य हे गुण जनतेच्या अंगी येण्यास बंदुका आणि तोफांपेक्षा साहित्याचाच उपयोग होतो. असे साहित्याचे महत्त्व त्यांनी व्यक्त केले आहे. साहित्याचा सर्व स्तरांतील लोकांशी संबंध येतो. एकूण साहित्याने सारे लोकजीवन व्यापले आहे. शब्दांच्या मदतीशिवाय कोणतेही काम पूर्ण करता येत नाही. शब्दांचा वापर करून त्यांच्यामार्फत विचार मांडले जातात. यासाठी कोणी लेखणीचा उपयोग करते तर कोणी भाषेचा उपयोग करतात पण या प्रगटीकरणातूनच शेवटी साहित्य-निर्मिती होत असते. संत तुकारामांनी आपल्या एका अभंगात म्हटले आहे.

आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने । शब्दांचीच शस्त्रे यत्न करू ।।
शब्दांचे अमुच्या जीवाचे जीवन । शब्दे वाटू धन जनलोका ।।
तुका म्हणे पहा शब्दांचे हा देव । शब्दांचे गौरव पूजा करू ।।

   

मराठी पुस्तके  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१५ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .