TOP HEADER
   
 • 001_Krishnakath.jpg
 • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
 • 003_Shabdhanche.jpg
 • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
 • 005_Saheb_14.jpg
 • 006_Yashodhan_76.jpg
 • 007_Yashodharshan.jpg
 • 008_Yashwant-Chintanik.jpg
 • 009_Kartrutva.jpg
 • 010_Maulik-Vichar.jpg
 • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
 • 012_Sahyadricheware.jpg
 • 013_Runanubandh.jpg
 • 014_Bhumika.jpg
 • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
 • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
 • Debacle-to-Revival-1.jpg
 • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
 • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
 • sing_3.jpg
   
   

गावात मध्यम स्थितीपासून ते उत्तम स्थितीत असलेली दहा-पंधरा ब्राह्मण कुटुंबेही होती. त्यांची काहीशी जमीनदारी होती. मुलेबाळे शिक्षणासाठी बाहेरगावी जात. परंतु माझ्या लहानपणी या मंडळींबद्दल गावात एक  प्रकारचा आदर असल्याचे मी पाहिले होते. पण या आदराच्या पदराखाली झाकलेले असे एक अंतर होते, त्याची जाणीव नंतर मला पुढे पुढे होऊ लागली.

असा हा, अनेकविध, वेगवेगळ्या स्तरांवरचे जीवन जगत असणारा, वेगवगळ्या संस्कृतीच्या पाकळ्या असणारा छोटासा समाज त्या गावामध्ये नांदत होता.

त्या गावाचा भौगोलिक परिसरही एका अर्थाने महत्त्वाचा होता. याचे मुख्य कारण या परिसरामध्ये असणारी महत्त्वाची देवालये. या गावाच्या नैर्ऋत्येला असलेल्या सागरेश्वराच्या मंदिराचे ठिकाण हे एक मन खेचून घेणारे असे स्थान होते. लिंगोबा हे दुसरे ठिकाण. लहान-मोठ्या डोंगराच्या कुशीत बसलेली ही देवस्थाने म्हणजे मनाला प्रसन्न करणारी चैतन्यस्थाने आहेत. कराड ते ताकारी या कृष्णेच्या खो-यातून वर जाणा-या मडंळींना सागरेश्वराची ही खिंड आणि सागरेश्वराचे मंदिर यांना भेट दिल्याशिवाय पुढे जाताच येत नसे.  त्यामुळे सागरोबा आणि देवराष्ट्र यांच्यामध्ये एक प्रकारचे अतूट नाते निर्माण झाले आहे.

या गावच्या उत्तरेला दोन-तीन मैलांवर एक  लहानसा ओढा वाहतो. तो ओढा या गावातल्या शेतीच्या ब-याचशा भागाला स्पर्श करून जातो. त्यामुळे त्याचे महत्त्व आहे. त्याचे नाव सोनहिरा. हा सोनहिरा माझ्या मनामध्ये फार मानाचे स्थान ठेवून आहे. मला माझी आई आठवली, की  देवराष्ट्र आठवते आणि मग सागरेश्वर, सोनहिरा यांची आठवण येते; आणि सोनहिरा म्हटले, म्हणजे मला माझ्या आईची आठवण येते.  लहानपणी अशी जी काही स्थाने भावनांना स्पर्श करून जातात, ती  केव्हा केव्हा आपल्या मनामध्ये कायमची महत्त्वाची प्रतीके बनून जातात, तसेच या स्थानांचे झालेले आहे.

देवराष्ट्रामध्ये तशी सुपीक जमीन थोडी आहे. त्यावेळी फक्त पाच-चार ठिकाणी पाण्याच्या विहिरी आणि त्यांच्या भोवताली असणारे हिरवे मळे एवढीच काही सुबत्तेची ठिकाणे होती, बाकी सर्वत्र कोरडवाहू शेती आणि त्या जिरायती कोरडवाहू शेतीवर काबाडकष्ट करणारे शेतकरी असे कष्टाचे चित्र डोळ्यांना दिसत असे आणि अनुभवाला येत असे.

गावाच्या या आर्थिक आणि सामाजिक पार्श्वभूमीवर गावकीच्या प्रश्नाकडे पाहण्याचा दृष्टिकोन मी जसा वयाने वाढत गेलो, तसा येत गेला. पुढे मी अनेक वर्षे या गावी येत राहिल्यामुळे त्यातील काही गोष्टी ज्या मी वेळोवेळी पाहिल्या, त्या काही या गावापुरत्याच मर्यादित होत्या, असे नव्हते. या गरिबीच्या पार्श्वभूमीवर राहणारी  माणसे ही माणुसकीला पारखी झाली नव्हती. ही त्यांतली मनाला ऊब देणारी गोष्ट आहे.

या समाजात माझ्या लहानपणी पाहिलेली काही माणसे आणि त्यांच्या काही आठवणी लोभसवाण्या आहेत. आमच्या आजोळच्या घराशेजारी असणा-या मुसलमान कुटुंबांशी असणारा घरोबा, त्याचप्रमाणे शेजारच्या सणगर आणि धनगर मंडळींशी असणारा जिव्हाळा हे त्यावेळचे सगळे आठवले, म्हणजे जातीजातींतील वैमनस्य ही समस्या पुढे केव्हा, कशी निर्माण झाली, हे समजत नाही. एकमेकांशी  माणुसकीच्या नात्याची बांधिलकी होती.

   

मराठी पुस्तके  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१५ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .