TOP HEADER
   
 • 001_Krishnakath.jpg
 • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
 • 003_Shabdhanche.jpg
 • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
 • 005_Saheb_14.jpg
 • 006_Yashodhan_76.jpg
 • 007_Yashodharshan.jpg
 • 008_Yashwant-Chintanik.jpg
 • 009_Kartrutva.jpg
 • 010_Maulik-Vichar.jpg
 • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
 • 012_Sahyadricheware.jpg
 • 013_Runanubandh.jpg
 • 014_Bhumika.jpg
 • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
 • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
 • Debacle-to-Revival-1.jpg
 • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
 • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
 • sing_3.jpg
   
   

आम्ही तेथून परत निघालो, तेव्हा आमच्या आईच्या डोळ्यात आंनदाचे अश्रू होते; कारण जिल्हा न्यायाधीशांनी माझ्या वडिलांच्या रिकाम्या जागी थोरल्या बंधूंना बेलीफ म्हणून घ्यायचे कबूल केले होते आणि तसा आदेशही दिला होता.

ही आठवण मी अशासाठी देतो आहे, की एका इंग्रज अधिका-याची माणुसकीची वागणूक प्रत्यक्ष अनुभवण्याचा प्रसंग माझ्या कुटुंबावर आलेला आहे, याची नोंद व्हावी.

आम्ही तेथून कराडला परतलो आणि एक-दोन आठवड्यांतच माझ्या बंधूंना नोकरीवर रूजू होण्याचा हुकूम मिळाला. आमचे घर थोडेसे स्थिरावले आणि कष्टप्रद का होईना, परंतु जीवनाचा पुढचा प्रवास सुरू झाला. माझ्या वडिलांच्या अकाली निधनाने कुटुंबावर आलेले संकट काहीसे सावरले होते. तरीसुद्धा आम्हांला आमच्या आजोळचा आसरा धरूनच चालण्याची जरूरी होती.  त्यामुळे प्रत्येक वर्षी दिवाळीच्या सुट्टीत किंवा एप्रिल-मे महिन्यांतील उन्हाळ्याच्या सुट्टीत कराडहून देवराष्ट्राला जाण्याचा आमचा कार्यक्रम हा आमचा नित्यक्रम होता. यामुळे माझे माध्यमिक शिक्षण पुरे होईतोपर्यंत देवराष्ट्र या गावाशी माझा संबंध सतत राहिला. त्यामुळे त्या गावातील सामाजिक परिस्थिती, तेथे पाहिलेली माणसे, तेथे आलेले अनुभव, ही सर्व माझ्या भावनाशील जीवनाचे अपरिहार्य अंग बनली आहेत.

देवराष्ट्र गावाची त्या  वेळची लोकसंख्या दीड-दोन हजारांची असावी. या छोट्या लोकसंख्येत सर्व जाती-जमाती होत्या. पाटलांची दोन घराणी तेथे होती. एक मोरे पाटील यांचे आणि दुसरे महिंद पाटील यांचे. यांशिवाय माझ्या आजोळचे घाडगे, म्हस्के, मुळीक, भोसले अशी आणखी पाच-पंचवीस मराठ्यांची घरे होती. धनगर वस्तीही काही प्रमाणात होती. दहा-पंधरा कुटुंबे तरी त्यांची असावीत. संख्येने दुसरे दोन मोठे समाज म्हणजे मुसलमान आणि रामोशी. यांच्याशिवाय व्यापार-उदीम करणारी काही लिंगायत व दोन-तीन गुजराती कुटुंबे सधन व सुखी अशी होती. लिंगायत मंडळीही अशीच ब-या परिस्थितीतली होती. दोन्ही पाटील घराण्यांतील फक्त  चार-दोन घरेच सुस्थितीत होती; कारण त्यांच्या शेतांत विहिरी वगैरे असल्यामुळे  ब-यापैकी पीकपाणी व साधने होती. पण बाकीची मात्र सामान्य स्थितीतली मंडळी होती.  मुसलमान समाज हा फारसा शेतीत नव्हता, परंतु दुसरे काही छोटे-मोठे उद्योग  करून ते लोक आपले जीवन कंठीत होते. गावात दहा-पाच मंदिरे होती. तशाच एक-दोन मशिदीही होत्या.

रामोशी समाज हा संख्येने बराच होता आणि गावात त्यांचा दबदबाही होता.  हा समाज मागासलेला होता, परंतु अस्पृश्य मानला जात नसे. शेजा-यापाजाऱ्यांमध्ये त्यांची वर्दळ असे. त्यांचा धंदा निश्चित काही नव्हता; परंतु अधून-मधून शेतीवर कामाला जाण्याचा उद्योग ते करीत असत. आणि गरिबीने आपला संसार चालवीत असत. एक-दोन घरांच्या खेरीज बाकीच्यांना सुव्यवस्थित बांधलेली घरे राहायला नव्हतीच. दगड एकमेकांवर रचून उभ्या केलेल्या भिंती आणि त्याही उंचीने कमी. पावसाळ्यात कशी तरी राहायची सोय होईल, अशी केलेली व्यवस्था. अशा, कशा तरी वस्तीमध्ये ही मंडळी राहात होती. ही वस्ती माझ्या आजोळच्या घराला लागून होती. त्यामुळे त्या समाजातल्या अनेकांशी माझी ओळख झाली होती. आणि तेथे गेल्यानंतर आमच्यामध्ये खेळायला येणा-या मुलांत जशी मराठ्यांची व मुसलमानांची मुले असत, तशीच रामोश्यांची मुलेही येत असत.  त्यामुळे कधी कधी त्यांच्या वस्तीत जाण्याचा प्रसंग येत असे. तेथे मी त्यांच्या बरोबर खेळलो आहे, हिंडलो-फिरलो आहे. लहानपणापासून त्यांच्या संगतीचा व निकट सहवासाचा हा अनुभव असल्यामुळे माझ्या मनात त्या समाजाविषयी कायमची आपुलकी घर करून राहिली आहे.

   

मराठी पुस्तके  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१५ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .