TOP HEADER
   
 • 001_Krishnakath.jpg
 • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
 • 003_Shabdhanche.jpg
 • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
 • 005_Saheb_14.jpg
 • 006_Yashodhan_76.jpg
 • 007_Yashodharshan.jpg
 • 008_Yashwant-Chintanik.jpg
 • 009_Kartrutva.jpg
 • 010_Maulik-Vichar.jpg
 • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
 • 012_Sahyadricheware.jpg
 • 013_Runanubandh.jpg
 • 014_Bhumika.jpg
 • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
 • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
 • Debacle-to-Revival-1.jpg
 • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
 • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
 • sing_3.jpg
   
   

यशवंतराव चव्हाण यांना महाराष्ट्रात झालेल्या या सर्व सामाजिक क्रांतीच्या चळवळीचं चांगलं भान होतं. राजकारणाच्या धकाधकीत राहूनही जोतिराव फुले, राजर्षी शाहू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर,कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांचं मोल ते जाणत होते. राजकारणाशी तडजोड करीत असतांनाच गरीब समाजाची मोडतोड होणार नाही याची ते काळजी घेत होते. यशवंतरावजींनी आपल्या संबंध ह्यातील सत्ता सोडली नसेल पण गरीब माणूस आपल्या धोरणातून सोडलेला नाही. अगदी गरीब कुटुंबातून प्रेमाच्या श्रीमंतीवर मोठा झालेला हा नेता होता. माणसाविषयीचं अतूट नातं त्यांच्या आईने त्यांच्यावर केलेल्या संस्कारातून निर्माण झालेलं होतं. ते म्हणतात त्या प्रमाणे त्यांची आईच त्यांची शाळा होता. प्रेमाचा संस्कार हाच त्यांचा विचार होता. ते एके ठिकाणी म्हणतात.

"महाराष्ट्रातील बहुसंख्य वस्ती खेड्यात आहे, आणि त्यात मराठा समाज बहुसंख्येने जास्त असल्याने महार-चांभार-ब्राह्मण-सुतार-माळी इत्यादि अल्पसंख्य़ी लोकांचे रक्षण करण्याची जबाबदारी मराठ्यांवर आहे.

यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राचं राज्य मराठी रयतेचं राज्य होईल याची ग्वाही दिलेली होती. महाराष्ट्राच्या लोकशाहीनं भारताला दिलेला हा नेता अष्टपैलू होता, समाजातील सर्वसामान्यांच्या प्रश्नांचं वास्तवाचं भान त्यांना होतं. साहित्य-संस्कृती-कला, ज्ञान आणि विज्ञान यावर त्यांची अपार श्रद्धा होती. लोकशाहीमध्ये अज्ञान नसते. तर लोकशाहीमध्ये संवाद असतो, संभाषण असते विचारांची आणि मतांची देवाण-घेवाण असते हे समजून घेऊनच त्यांनी लोकशाहीला जाणतं नेतृत्व दिलं " कोणाही कार्यकर्त्याने आंधळे असू नये, आंधळा दुनियेत हिंडू शकेल पण आंधळ्याच्या मागे दुनिया जाऊ शकणार नाही" हे त्यांचं सांगणं होतं.

हा जो संबंध चळवळीचा दृष्टीकोन तो अगदी वेळ थोडा असल्यामुळं आज आणि उद्या मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे.

म. जोतिराव फुले महात्म्यांचे महात्मा आहेत. भारतातील अनेक समाजसुधारकांनी आणि विचारवंतांनी लोकांच्या प्रश्नांकडे थोड्य़ाशा अंतरावरुन लोकांपासून दूर राहून पाहिले. जोतिराव फुले मात्र प्रत्यक्षत: सामाजिक चळवळीच्या संघर्षातच उभे होते. ते केवळ समाज प्रबोधक अगर सुधारक नव्हते तर त्यांची कृती आणि विचार क्रांतिकारकाचे होते. त्यांच्या या क्रांतिकार्याचा प्रवास प्रबोधनापासून केवळ सुधारणावादापर्यंतच होऊ शकला नाही. तर सुधारणावादापासून बंडखोरीपर्यंत आणि बंडखोरीपासून ते क्रांतिपर्यंत होऊ शकला. महाराष्ट्राच्या विधानभवनासमोर जो फुल्यांचा शेतकरी पोषाखातील भव्य असा पुतळा पाहिल्यानंतर आपणाला आनंद वाटतो. शेतकरी पोषाखातील महात्मा फुले आपल्या हातात पुस्तक घेऊन उभे आहेत. जणू शेती संस्कृतीचं मस्तकच त्यांच्या रुपानं विधानभवनासमोर उभं आहे. ज्या शेती संस्कृतीपर्यंत, शेतक-यांच्या झोपडीपर्यंत ज्ञान आणि विज्ञान पोहोचलेलं नव्हतं अशा संस्कृतीमधून हा उभा राहिलेला महापुरुष एक विशाल क्रांतीच प्रतिक म्हणून आज आपणाला क्रांतीचा संदेश देत उभा आहे ज्यांनी महाराष्ट्रात अगदी पहिल्यांदा सांगितलं शोषण मुक्तीसाठी ज्ञानाची लोकशाही पाहिजे म्हणून. लोकशाही राजवट येण्याच्या शंभर वर्षे अगोदर हा लोकांचा तत्ववेत्ता लोकशाही मूल्यांची बीजे या मातीत पेरत होता. रयतेच्या विकासासाठी शैक्षणिक समानतेच तत्त्व प्रत्यक्ष कृतीतून राबवत होता. कोणत्याही समाजातली कर्तृत्ववान माणसं ही पावसासारखी आकाशातून येत नाहीत. समुद्रावरून जसे ढग यावेत आणि पाऊस कोसळावा तसं नेतृत्व आकाशातून उतरत नाही. वडाचं प्रचंड झाड आपल्या मुळ्या मातीत रोवून त्या मातीतले जीवनसत्व आपल्या मुळ्यांनी शोधून आकाशदिशेने वाढत जाते तशी मोठी माणसं आपल्या बौद्धिक जाणीवा सर्वसामान्यांच्या मनात रोवून ही माणसं मोठी होतात. जोतिराव फुले आज नाहीत. पण त्यांचा विचार, त्यांची कृती आणि त्यांनी निर्माण केलेली सामाजिक समतेची संस्कृती आपणाला एक क्रांतीपाठ शिकवत सामाजिक कार्याची प्रेरणा देते.


   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१५ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .