TOP HEADER
   
 • 001_Krishnakath.jpg
 • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
 • 003_Shabdhanche.jpg
 • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
 • 005_Saheb_14.jpg
 • 006_Yashodhan_76.jpg
 • 007_Yashodharshan.jpg
 • 008_Yashwant-Chintanik.jpg
 • 009_Kartrutva.jpg
 • 010_Maulik-Vichar.jpg
 • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
 • 012_Sahyadricheware.jpg
 • 013_Runanubandh.jpg
 • 014_Bhumika.jpg
 • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
 • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
 • Debacle-to-Revival-1.jpg
 • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
 • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
 • sing_3.jpg
   
   

समाजपरिवर्तनाच्या मोहिमेला तर्कशुद्ध आधार दिला होता तो एम्. एन्. रॉय यांनी याची चव्हाणांना कल्पना होती. ते रॉय पंथात समाविष्ट झाले नाहीत. पण रॉय यांच्या ध्येयधोरणाबद्दल, त्यांच्या कार्यक्रमाबद्दल त्यांना फार आस्था असे. रॉय यांनी आग्रहपूर्वक सांगीतले होते की सारा समाज सुसंस्कृत, नवमतवादी झाल्याशिवाय राजकीय क्रांतीला पूर्णत्व येणार नाही. रॉय यांना सारा समाज विचारी, विज्ञानाबद्दलची आस्था ठेवणारा बनवावयाचा होता. एकतर ज्याला बहुजनसमाज म्हणतात, त्याच्याशी रॉय यांना संपर्क साधावयाचा होता आणि त्या समाजाची बौद्धिक सांस्कृतिक पातळी उच्च दर्जाची त्यांना करावयाची होती. १९३७ साली तुरुंगातून सुटल्यानंतर ते जेव्हा पुण्याला आले तेव्हां त्यांनी आपली एक सभा जेधे मॅन्शनमध्ये घेण्याची सूचना केली होती. रॉय हे मॉस्कोमध्ये मनन, वाचन करीत असताना त्यांनी भारताबद्दल एक उत्कृष्ट पुस्तक लिहिले होते. India in Transition हे त्या पुस्तकाचे नांव. अत्यंत वाचनीय आणि विचार प्रवर्तक ते पुस्तक आहे. त्यात रॉय यांनी वेगवेगळ्या पुढा-यांची भूमिका कशी आहे, त्या भूमिकांमध्ये गुणावगुण कोणते आहेत, त्यांची विचारसरणी पुरोगामी किती आहे, प्रतिगामी किती आहे, समाजपरिवर्तनाबद्दल प्रत्येकाची भूमिका कशी आहे याची चिकित्सा केलेली आहे. रॉय यांची धारणा अशी होती की सामान्य बहुजनसमाज आपल्या आंदोलनामध्ये सामील झाल्याशिवाय त्या आंदोलनाला धार चढणार नाही. जेधे मॅन्शनमध्ये सभा घेण्याची त्यांना कल्पना सुचली त्याचे कारण बहुजनसमाज तेथे एकवटलेला आहे, अशी त्यांची भावना होती. स्वतः यशवंतरावांनी त्यांना पुढे एकदा प्रश्न केला की जेधे मॅन्शनमध्ये सभा घेण्याची कल्पना तुम्हाला का सुचली. त्यावर रॉय यांनी उत्तर दिले होते, “हा तुमचा समाज आहे आणि या समाजाच्या भावभावना तुम्ही जाणून घेतल्या पाहिजेत हे तुम्हाला दाखवून देण्यासाठी मी जेधे मॅन्शनमध्ये ही सभा घेतली.”

रॉय यांना जे समाजपरिवर्तन हवे होते ते प्रबोधनातून होणारे समाजपरिवर्तन होय. अंधश्रद्धा, जाचक रूढी आणि संस्कार झुगारून दिल्या पाहिजेत आणि तर्कावर आधारलेला विज्ञाननिष्ठ दृष्टिकोण आपण स्वीकारला पाहिजे हा रॉय यांचा आग्रह होता. आज राजीव गांधी ज्या “सायंटिफिक टेंपर”चा पुरस्कार करीत आहेत तो शास्त्रशुद्ध विज्ञाननिष्ठ दृष्टिकोण रॉय यांना हवा होता. यशवंतराव चव्हाण यांनी आपल्या परीने तीच विचारधारा समाजापुढे ठेवली. आणि त्या दृष्टीने अधिकारारूढ झाल्यानंतर त्यांनी काही नव्या योजना अंमलात आणल्या, काही नवेनवे संकेत निर्माण केले. हे संकेत शिक्षणाच्या क्षेत्रात त्यांनी आणले. त्यांनी हे जाणले होते की सामान्य, अडाणी, दरिद्री शेतक-याला आणि मजूराला शिक्षण उपलब्ध करून द्यावयाचे असेल तर शिक्षण हे त्यांना माफक मिळेल अशी व्यवस्था करावी लागेल त्या हेतूने त्यांनी एक क्रांतिकारक पाऊल टाकले आणि वर्षाला फक्त १२०० रुपयांपर्यंतचे ज्यांचे उत्पन्न आहे त्यांच्या मुलांना त्यांनी शिक्षण सर्वस्वी मोफत केले.

त्याच्या जोडीला समाजप्रबोधनाच्या हेतूने त्यांनी साहित्यनिर्मितीकडे लक्ष पुरविले. महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्याबरोबर धोरणात्मक ज्या घोषणा त्यांनी केल्या त्यांत साहित्य आणि संस्कृति मंडळाच्या स्थापनेला त्यांनी अग्रस्थान दिले. साहित्य संस्कृति मंडळाच्या अध्यक्षपदी त्यांनी गाढे विद्वान तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांची नेमणूक केली. त्यांना यशवंतरावांनी सांगितले की तुम्हाला ध्येयधोरण ठरविण्याचा पूर्ण अधिकार राहील आणि सरकारी दडपणे आणि आज्ञा यांचा अडसरही तुमच्या मार्गात येणार नाही. यशवंतरावांना मराठी भाषेत आणावयाचे होते ते मौलिक वाङमय होय – मग ते साहित्य, काव्य, कलेचे असो की विज्ञानाचे असो. यशवंतरावांनी शास्त्रीजींवर जो विश्वास टाकला तो त्यांनी शंभर टक्के फलद्रुप केला ही खरी आनंदाची गोष्ट होय. साहित्य संस्कृति मंडळाने गेल्या वीस वर्षाच्या काळात हजारावर मौलिक ग्रंथ मराठी भाषेत आणले. आणि आजवर अज्ञात राहिलेले साहित्य प्रकाशात आणले. यशवंतरावांनी विश्वकोशाचे (Encyclopedia) कामही शास्त्रीजींकडे सुपूर्द केले. यशवंतरावांचे वैशिष्ट्य असे आहे की ते फारसे बोलत नाहीत, वायफळ चर्चा करीत नाहीत, ते स्वतःच्या विचारात मग्न असतात आणि स्वतःच्या मननातून आपल्या कार्याची दिशा ते ठरवितात. सांस्कृतिक पुनरुज्जीवनाच्या आंदोलनाला त्यांनी जेवढे पाठबळ दिले असेल तेवढे दुस-या कोणत्याही मुख्यमंत्र्याला देता आले नाही ही वस्तुस्थिती आहे. यशवंतरावांना समाजाची काळजी होती, समाजाबद्दल आस्था होती आणि हा समाज उन्नत झाला पाहिजे, विशेषतः ग्रामीण समाज उन्नत झाला पाहिजे हाच त्यांचा ध्यास होता.

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१५ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .