TOP HEADER
   
 • 001_Krishnakath.jpg
 • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
 • 003_Shabdhanche.jpg
 • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
 • 005_Saheb_14.jpg
 • 006_Yashodhan_76.jpg
 • 007_Yashodharshan.jpg
 • 008_Yashwant-Chintanik.jpg
 • 009_Kartrutva.jpg
 • 010_Maulik-Vichar.jpg
 • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
 • 012_Sahyadricheware.jpg
 • 013_Runanubandh.jpg
 • 014_Bhumika.jpg
 • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
 • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
 • Debacle-to-Revival-1.jpg
 • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
 • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
 • sing_3.jpg
   
   

महाराष्ट्रामधे त्यावेळी दोन गट प्रबळ होते. एक गट सुधारकांचा तो आगरकरांचा गट म्हणून ओळखला जात होता. दुसरा गट लोकमान्य टिळकांचा तो राष्ट्रवादी गट होता. यशवंतराव असे चाणाक्ष होते की त्यांनी राजकारणामधे राष्ट्रवादाचे प्रवक्ते असलेल्या लोकमान्य टिळकांचा वारसा स्वीकारला. समाजकारणामधे मात्र त्यांनी ज्योतिबा फुले, शाहू महाराज, आगरकर, विठ्ठल रामजी शिंदे यांचा वारसा स्वीकारला. राजकारण व समाजकारण यांचा समन्वय साधणे हे यशवंतरावांचे वैशिष्ट्यच होय. पण राजकीय क्षेत्रातील काँग्रेसच्या निष्ठेपासून ते जसे विचलित झाले नाहित. त्याचप्रमाणे समाजपरिवर्तनांच्या ध्येयापासूनही ते कधी ढळले नाहीत. काँग्रेस संघटना ही त्यांनी आपली मानली आणि जनतेच्या स्वातंत्र्य आंदोलनाचे एकमेव प्रतीक म्हणून त्यांनी काँग्रेसशिवाय दुस-या कोणत्याही पक्षाला वा संघटनेला जवळ केले नाही. समाजकारणामधे विशेषतः शाहू महाराजांनी जे कर्तृत्व गाजविले त्याबद्दल यशवंतरावांना नितांत अभिमान वाटत असे. पुष्कळवेळा त्यांच्याविषयी चर्चा करताना ते ठासून म्हणत असत की शाहू महाराज हे शाहू छत्रपती होते. पण या छत्रपतींनी खरा आधार अस्पृश्यांना दिला. अस्पृश्यांच्या पंक्तीत बसून जेवण घेणारा तो उदार हृदयी राजा होता. अस्पृश्यता निवारणाचे प्रत्यक्ष कार्य शाहू छत्रपतींनीच करून दाखविले; नुसता संदेश देत बसले नाहीत. शाहू महाराजांनी ब्राह्मणांविरूद्ध जे बंड पुकारले ते अन्यायाविरूद्ध बंड होते.

त्यांच्या कारकीर्दीत जे वेदोक्त प्रकरण निर्माण झाले त्याचा उगम कसा झाला याकडे जरा लक्ष द्या. कोल्हापूरच्या ब्राह्मणवर्गाने असा हट्टाग्रह धरला की वेदपठणाचा अधिकार जर कोणाला असेल तर तो फक्त ब्राह्मणजातीलाच होय. त्यातून असे सूचित केले जात होते की, ब्राह्मणाखेरीज इतर जाती - त्यात अस्पृश्य हे तर आलेच - या शूद्र जाती होत. हा अहंकार आणि हा उन्मत्तपणा कोणत्या थराला गेला होता त्याची कहाणी खरोखरचं ऐकण्या सारखी आहे. त्याचे असे झाले की छत्रपती शाहू महाराज हे भल्या पहाटे रंकाळा तलावावर स्नानासाठी जात असत. त्यावेळी वेद-मंत्र म्हणण्यासाठी त्यांनी ब्राह्मणाची नेमणूक केली होती. ते भटजी पागोटे घालून व फेटा बांधून आणि अंगात बंडी व अंगरखा घालून तिथे मंत्र म्हणत असत. एके दिवशी शाहू महाराजांनी त्यांना सहज विचारले ‘का हो भटजी, तुम्ही आंघोळ वगैरे करून आलात का? “त्यावर त्यांनी उद्दामपणे महाराजांना उत्तर दिले, “ब्राह्मणाला शुचिर्भूत होण्यासाठी आंघोळीची गरज लागत नाही. तो जन्मजात पवित्रच असतो.” ते उत्तर ऐकताच शाहू महाराजांना संताप आला आणि त्यानी विचारले, “म्हणजे आम्ही अपवित्र काय?” भटजी म्हणाले, “होय, त्यात संशय नाही” भटजीचे हे उद्गार शाहू महाराजांच्या दृष्टीने ब्राह्मण्याचा अविष्कार होता. त्यांनी लगेच बंड पुकारले. पण ते ब्राह्मणांविरुद्ध नव्हे, ते ब्राह्मण्याविरुद्ध बंड होते. महाराजांनी ब्राह्मणांवर कधी हात उगारला नाही. पण वेदोक्ताचा अधिकार सर्व जातीजमातींना आहे, तो केवळ ब्राह्मणांचाच अधिकार नव्हे हे मात्र त्यांनी ठासून जाहीर केले आणि हा अधिकार गाजविण्यालाही सुरुवात केली. त्यानंतर ब्राह्मणातील काही मंडळी त्यांचे समाधान करण्यासाठी म्हणू लागले की छत्रपती या नात्याने वेदोक्ताचा अधिकार त्यांना प्राप्त होतो. पण इतरांना त्या अधिकाराचा उपभोग घेता येणार नाही. शाहू छत्रपतींचे या तडजोडीने तसेच लाचारीने समाधान झाले नाही.

यशवंतराव चव्हाण यांचा जन्म देवराष्ट्रे येथे झाला. त्यांचे शिक्षण कराडात आणि पुण्यातही झाले. पण त्यांच्यावर संस्कार केले ते कोल्हापूरानेच. त्यांच्या मनावर परिणाम घडविणा-या निरनिराळ्या चळवळी महाराष्ट्रात सुरू झाल्या. शाहू महाराजांनी ब्राह्मण्याविरुद्ध दंड थोपटले आणि समाजसुधारणेची ध्वजपताका कोल्हापुरात रोवली. त्यापूर्वी ज्योतिबांनी शिक्षणाची, स्त्री शिक्षणाची तशीच दलित शिक्षणाची मोहीम उघडली, अण्णासाहेब कर्वे यांनी स्त्रीशिक्षणाबरोबरच विधवा विवाहाचा पायंडा पाडला, विठ्ठल रामजी शिंदे यांनी राजकारणात जसा भाग घेतला त्याचप्रमाणे समाजकारणातही नवनवीन मूल्ये निर्माण केली, भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेच्या रूपाने सबंध ग्रामीण भागात बहुजन समाजाला सुशिक्षित करण्याचा चंग बांधला. या सा-या चळवळी यशवंतरावांच्या डोळ्यासमोर फोफावत गेल्या आणि त्यांच्या मनाची घडण पुरोगामी स्वरूपाची होत गेली.

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१५ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .