TOP HEADER
   
 • 001_Krishnakath.jpg
 • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
 • 003_Shabdhanche.jpg
 • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
 • 005_Saheb_14.jpg
 • 006_Yashodhan_76.jpg
 • 007_Yashodharshan.jpg
 • 008_Yashwant-Chintanik.jpg
 • 009_Kartrutva.jpg
 • 010_Maulik-Vichar.jpg
 • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
 • 012_Sahyadricheware.jpg
 • 013_Runanubandh.jpg
 • 014_Bhumika.jpg
 • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
 • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
 • Debacle-to-Revival-1.jpg
 • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
 • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
 • sing_3.jpg
   
   

या ज्या मूलभूत कल्पना, त्या मूलभूत कल्पनांच्या आधारावरती एक नवा समाज पंडितजींना आणि त्यांच्या तत्कालीन सहका-यांना या देशात उभा करायचा होता या पार्श्वभूमीवर देशांच राजकारण सुरू झालं. राष्ट्राच्या अर्थकारणाला एक निश्चित दिशा सापडली. अर्थकारणाला दिशा आली समाजवादाची ! आता हा समाजवाद काय होता? या समाजवादाचं आज आपण नेहमीच नाव घेतो. समाजवाद म्हणजे काय? आता एक आधुनिक कल्पना समाजवादाची झालेली आहे. पूर्वीची कल्पना काय होती?  की उत्पादनाची साधनं काही मूठभर व्यक्तीच्या हातामध्ये असतात. उत्पादनवाढ झाली म्हणजे त्याचा फायदा मूठभर माणसांच्या हातामध्ये जातो. मूठभर माणसे श्रीमंत होतात. आणि ज्यांच्या आधाराने ती श्रीमंत होतात ती असंख्य माणसं दारिद्र्यामध्ये पिचत राहतात. जुलमाखाली भरडली जातात. आणि ही माणसं बंड करून उठली की मग अशा प्रकारच्या श्रीमंत वर्ग नष्ट करून टाकतात. शस्त्रबलाने, क्रांती करून, त्याचे रक्त शोषून आणि उत्पादनाची साधनं सगळ्या समाजाच्या हातामध्ये देऊन, जे काही त्याच्यातून निर्माण होईल ते सगळ्यांना वाटणे आणि असं संगळ्यांना वाटून झालं की मोह शिल्लक राहत नाही. जास्त कुणाला मिळत नाही, स्पर्धा शिल्लक रहात नाही. आणि त्या मुळे द्वेष उरत नाही, आणि द्वेष नसलेला, वर्ग नसलेला अशा प्रकारचा वर्गविहीन समाज निर्माण होतो. आणि द्वेष नाही, मत्सर नाही, स्पर्धा नाही तिथे राज्य करण्याची सुध्दा गरज नसल्यामुळे तिथे राज्य यंत्रणा सुध्दा गळून पडते. अशी दंडहीन आणि वर्गहीन अशाप्रकारची समाजरचना निर्माण होणे यालाच समाजवाद असं म्हणतात. मार्क्सचा शास्त्रीय समाजवाद हा अशा प्रकारचा होता. परंतु त्या समाजवादाची कल्पना आता त्याच देशामध्ये बदलली. रशियाने ज्या मार्क्सच्या तत्त्वज्ञानाच्या आधारावर आपल्या राष्ट्रामध्ये समाजवाद स्थापन करण्याचा प्रयत्न केला, एक पक्षीय हुकुमशाही स्थापन करून ! त्याच राष्ट्रामध्ये आता याची पुनर्रचना करण्याची गरज त्यांना भासायला लागली. आणि जिथे कुठलाही खाजगी मालकीचा माणसाला अधिकार नव्हता तिथे आता काही निवडक क्षेत्रांमध्ये खाजगी मालकीचा अधिकार दिला तरी चालेल असा विचार यायला लागला. अल्पकाळामध्ये याच विचारसरणीतून मोठी प्रगती साधणा-या चीनसारख्या देशामध्ये सुध्दा त्यांच्या पंतप्रधानांचं निधन झाल्यानंतर आता तिथे काय होते आहे याच्याकडे जगांच लक्ष लागले आहे? म्हणजेच मानवी मूलभूत अशा प्रकारच्या विकारपासूनही थोर तत्त्वज्ञानंसुध्दा सुटू शकत नाहीत. असा अनुभव आज जगाला येतो आहे.

निव्वळ थोर तत्त्वज्ञान जगातल्या कुठल्याही राष्ट्राचा प्रश्न सोडवू शकत नाही. आणि म्हणून त्याच्या मूल्यामध्ये काळाप्रमाणे पुनर्रचना करावी लागते. कुठलेही तत्त्व हे एखाद्या काळाला पूर्ण लागू ठरले, ते यशस्वी झाले, म्हणून ते सगळ्याच काळांना सगळ्याच ठिकाणी, सगळ्याच समाजाला लागू पडते असे नसून त्याचा वेगवेगळ्या समाजाला वेगवेगळ्या काळी, वेगवेगळ्या परिस्थितीत यशस्वी व्हायचं असेल तर त्या तत्त्वांची पुनर्रचना करावी लागते. भारतीय समाजरचनेच्या पुनर्रचनेमध्ये किंवा त्याच्या परिवर्तनामध्ये जर कुठला प्रयोग चालू असेल तर या तत्त्वांच्या पुनर्रचनेचा प्रयोग चालू आहे. म्हणून या देशामध्ये समाजवादाकडे वाटचाल करणारी सार्वजनिक क्षेत्रं आहेत. राष्ट्रीयीकरणाचे प्रयोग चालू आहेत. त्याच वेळेला माणसाच्या अस्मितेला, माणसाच्या निर्मितिक्षमतेला, माणसातील महत्त्वाकांक्षेला आणि त्याचा आधार घेऊन राष्ट्राला पुढे नेण्याचा खाजगी क्षेत्रालासुध्दा तितकाच वाव आहे. समाजसत्ताक राष्ट्रात सर्व समान आहेत. अशा प्रकारच्या समतेचा स्वीकार करीत असतानाच व्यक्तिगत विचारांना आपल्या मनाला येईल त्याप्रमाणे आचार विचार करण्याचे स्वातंत्र्य व संधी देऊन अशी व्यक्तिस्वातंत्र्याची कल्पना स्वीकारून या मूलभूत हक्कांची प्रतिष्ठाही राखलेली आहे. पण या सर्व संकल्पनाचा विचार व आचार या देशातील केवळ नेत्यांनी करून चालणार नाही; हे आव्हान या देशातील पुढा-यांनीच केवळ स्वीकारून चालणार नाही. तर हे आव्हान सामान्य माणसांनी समजावून घेण्याची वेळ आलेली आहे. आणि हे जे दुसरे परिवर्तन आहे त्याचा विचार समाजाच्या अगदी शेवटच्या थरापर्यंत नेऊन पोहोचविण्याचे बाबातीत आपण दुबळे ठरलेलो आहोत. सुशिक्षित म्हणवणारी माणसंदेखील या बाबातीत कितीतरी अडाणी असलेली मी पाहिलेली आहेत. राजकीय दृष्टीने अपक्व असलेली पाहिली आहेत. त्यांना राजकीय विचारच माहित नसतात. त्यांना राजकीय विचारप्रणालीच नसते. राष्ट्रामध्ये निर्माण झालेले विविध ताणही माहीत नसतात. ते स्व:त:च्या सुखदु:खामध्ये इतके रममाण असतात की त्यांच्या वैयक्तिक सुखाला एकदा कात्री बसली की ते ताबडतोब प्रतिकूल उद्गार काढतात. त्यांच्या सुखामध्ये थोडी वाढ झाली की ताबडतोब अनुकूल उद्गार काढतात. व्यक्तिगत स्वार्थापोटी सगळं राजकारण, सगळं अर्थकारण, सगळं समाजकारण तापासणा-या माणसांची संख्या सध्या देशामध्ये ज्यास्त झाली असल्यामुळे ब-याच वेळेला राष्ट्रीय संदर्भ चुकतो, सुटतो आणि आपण नेमकं काय मिळवलं हे लक्षात न आल्यामुळे आपण खूप खूप गमावले असं सारखं आपणाला वाटत रहातं. परंतू राजकीय दृष्टिकोनातून अशा प्रकारची फार मोठी क्षमता या देशाने प्राप्त केलेली आहे. हे जर आपण लक्षात घेतले तर राजकीय परिवर्तनाच्या दृष्टीने या देशाने फारच मोठा पल्ला गाठला आहे असे जर मी म्हटले तर ते अतिशयोक्तीचे होणार नाही.

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१५ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .