TOP HEADER
   
 • 001_Krishnakath.jpg
 • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
 • 003_Shabdhanche.jpg
 • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
 • 005_Saheb_14.jpg
 • 006_Yashodhan_76.jpg
 • 007_Yashodharshan.jpg
 • 008_Yashwant-Chintanik.jpg
 • 009_Kartrutva.jpg
 • 010_Maulik-Vichar.jpg
 • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
 • 012_Sahyadricheware.jpg
 • 013_Runanubandh.jpg
 • 014_Bhumika.jpg
 • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
 • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
 • Debacle-to-Revival-1.jpg
 • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
 • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
 • sing_3.jpg
   
   

कराड नगरपालिकेचे नगराध्यक्ष श्री. पी. डी. पाटील आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या प्रिय बंधू भगिनींनो, आज यशवंतराव चव्हाण व्याख्यानमालेच्या निमित्ताने पहिल्यांदाच कराडला येत आहे.

नुकत्याच होऊन गेलेल्या साहित्य संमेलनाला येण्याची संधी लाभली नव्हती. आणि त्यामुळे मन थोडसं खट्टू झालेलं. एका सुंदर अशा साहित्य सोहळ्याला आपण मुकलो त्याहीपेक्षा यशवंतराव चव्हाणांचं, दुर्गाबाई भागवतांच, आणि तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींचं अशी तिघांची विचारपरिपूर्ण भाषणे प्रत्यक्ष ऐकायची संधी मिळाली नाही. याची चुटपूट मनाला लागलेली होती. त्याच कराडमध्ये इतक्या अल्पावधीच्या काळामध्ये आपल्याला भाषण करायला यावे लागेल असे मला वाटले नव्हते. परंतु अचानक आमंत्रण येऊन ठेपले आणि ते नाकांरण तर अशक्य होतं. अडचणीच्या परिस्थितीत असूनही मी कराडच्या वेगळ्या आकर्षणाने ते आमंत्रण स्वीकारले. परंतु ते आमंत्रण स्वीकारीत असताना दोन महत्वाच्या गोष्टी मनात होत्या एक गोष्ट मनामध्ये होती ती ही की  यशवंतराव चव्हाणांसारख्या देशाला वैचारिक नेतृत्व देणा-या एका श्रेष्ठ व्यक्तिच्या नावाने ही मालिका गुंफली जात आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट होती ती ही की यशवंतरावांसारखं श्रेष्ठ व्यक्तिमत्त्व असणा-या माणसाच्या नावांन गुंफलेली गेलेली ही व्याखानमाला केवळ शोभेची व्याख्यानमाला नसून जीवनाच्या प्रचलित प्रश्नांसंबंधीचे, जे गंभीर विषय असतील त्या विषयांचे संदर्भ लक्षात घेऊन त्या संबंधी गुंफली जाणारी असल्यामुळे मला येथे अगत्याने यावंसं वाटलं. मी स्वत: जरी शिक्षण क्षेत्रामध्ये काम करीत असलो तरी माझं आजवरचं जीवन हे समाजाच्या अगदी खालच्या स्तरामध्ये प्रारंभापासून आतापर्यंत व्यतीत झालेले आहे. त्यामुळे, त्या समाजाच्या उत्कर्षासंबंधानं ज्या विचाराचे चिंतन माझ्या मनात सतत चालू असते त्याचं परिशीलन करण्याचा, ते मांडण्याचा आनंद माझ्या मनाला होत आहे. यशवंतराव चव्हाणांशी माझे संबंध हे अत्यंत स्नेहेचे आहेत. एक विचारवंत मार्गदर्शक म्हणून अनेक वेळा अनेक विषयांवरती त्यांच्याशी बोलण्याचा, त्यांचेकडून मार्गदर्शन घेण्याचा प्रसंग माझ्यावर अनेक वेळेला आलेला आहे. जीवनाचं वैचारिक अधिष्ठान मानणारी व ते निर्माण करणारी जी थोडीथोडकी माणसं आहेत त्यांत यशवंतरावांचे स्थान फार वरचं आहे. त्यांच्या विचारशील व्यक्तिमत्त्वाच्या आकर्षणाने या व्याख्यानमालेमध्ये त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी सहभागी होत आहे. उदया त्यांचा वाढदिवस ! त्या संदर्भात आजच मला त्यांचा एक विशेष आवर्जून उल्लेख करावासा वाटतो तो अनेक वेळा संभ्रमित झाल्यानंतर आता नेमकं काय करावं अशी जी प्रत्येक माणसाची अर्जुनासारखी स्थिती होते त्या वेळी मार्गदर्शन देणारं कुणी तरी लागतं. “किम् कर्म किम् कर्मेति कवयोप्यत्र मोहिता: |” काय करावं व काय करू नये या संबंधीचा संभ्रम माणसाच्या मनामध्ये निर्माण झाला, की त्याला विचारांची स्फूर्ती देणारा आणि नव्या कार्याची दिशा दाखविणारा असा द्रष्टा माणूस माणसाला हवा असतो. सांगायला आनंद वाटतो की माझ्या राजकीय तसेच सामाजिक जीवनामध्ये ज्या ज्या वेळेला मला असा प्रश्न पडला त्या वेळेला जी फारच थोडी माणसं मला मार्गदर्शनासाठी मिळाली त्या मध्ये मा. यशवंतराव एक आहोत. याचा उल्लेख मी केवळ या ठिकाणी शोभेसाठी करीत नाही, तर माझ्या व्याख्यानविषयामध्ये जे सूत्र येणार आहे, जो विषय मी माझ्या आजच्या प्रतिपादनासाठी  घेतलेला आहे,  “भारतीय समाजाच्या परिवर्तनाची दिशा आणि वेग” हा त्या विषयाशी त्याच्या निकटचा संदर्भ आहे. कारण कुठल्याही समाजाचे आमूलाग्र परिवर्तन घडवायचं असेल तर केवळ त्याच्या बाह्यस्थितीमध्ये, त्याच्या आवतीभोवतीच्या वातावरणामध्ये, त्याच्या कपडयालत्त्यामध्ये, वेषभूषेमध्ये, भाषेमध्ये वरवरचे फरक केल्याने ते परिवर्तन होत नाही. ख-या अर्थाने ते जर परिवर्तन व्हायचे असेल तर त्या समाजाच्या “मन, बुध्दी आणि आत्मा” या ज्या तीन महत्तम शक्ती आपण मानतो त्या तीन शक्तींमध्ये मूलभूत अशा प्रकारचे फरक झाले तर त्याला आपण परिवर्तन म्हणायला हवं. अशा या परिवर्तनामध्ये विचार हे फार मोठं शास्त्र होय. विचार हे फार मोठं साधन जगाच्या आतापर्यंतच्या इतिहासामध्ये क्रांती व परिवर्तन यासाठी आवश्यक मानलं गेलं आहे. विशेषत: लोकशाहीमध्ये त्याची अत्यंत गरज असल्यामुळे वैचारिक नेतृत्व देणारा माणूस म्हणून यशवंतरावांचा उल्लेख केला.

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१५ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .