TOP HEADER
   
 • 001_Krishnakath.jpg
 • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
 • 003_Shabdhanche.jpg
 • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
 • 005_Saheb_14.jpg
 • 006_Yashodhan_76.jpg
 • 007_Yashodharshan.jpg
 • 008_Yashwant-Chintanik.jpg
 • 009_Kartrutva.jpg
 • 010_Maulik-Vichar.jpg
 • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
 • 012_Sahyadricheware.jpg
 • 013_Runanubandh.jpg
 • 014_Bhumika.jpg
 • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
 • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
 • Debacle-to-Revival-1.jpg
 • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
 • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
 • sing_3.jpg
   
   

कोणीही बोलावणे आल्याशिवाय परमेश्वराकडे जात नाहीच. श्री. वाजपेयींनाही ते बोलावणे लवकर येऊ नये, अशीच माझी इच्छा आहे. परंतु त्याचबरोबर त्यांनी सैतानाची भेट घेतानाही काळजी घ्यावी, असे मी मित्र म्हणून सुचवेन. केवळ आमंत्रण आले, म्हणून सैतानांच्या भेटीला जायची घाई करू नका.

चीनबरोबर मैत्री प्रस्थापित करताना आपल्याला बरीच सावधानता बाळगायला हवी. त्या देशाशी राजनैतिक संबंध पुन्हा प्रस्थापित करण्याचे कार्य मागच्या काँग्रेस सरकारनेच पार पाडले होते. त्यावेळी चीनमधील आणि अन्य आशियाई विभागातील वास्तव परिस्थितीचे आम्ही मूल्यमापन केले होते. या मूल्यमापनाला वास्तवाचा आधार होता. त्यानंतर चीन बदलला आहे, असे म्हणता येईल का? चीनसारख्या देशातील परिस्थितीचे खरेखुरे मूल्यमापन करायचे असेल, तर परराष्ट्रमंत्र्यांच्या चीन-भेटीनंतर पेकिंगमध्ये वा दिल्लीमध्ये काय सांगण्यात आले, यावर केवळ विसंबून चालणार नाही. चीन हा जागतिक राजकारणातील एक महत्त्वाचा देश आहे आणि मोठ्या देशासारखाच तो वागत असतो. तो अनेक दृष्टींनी मोठा आहे, हे तर खरेच आहे. परंतु प्रश्न असा आहे, की चीनला आपल्या शेजा-यासंबंधी काय वाटते? त्याचा जागतिक दृष्टिकोण काय आहे, हे अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि म्हणून चीनशी मैत्री करण्याची इच्छा बाळगणा-याला हे प्रश्न विचारात घ्यावेच लागतील.

जगाकडे पाहण्याचा चीनचा दृष्टिकोण कोणता आहे? तिसरे जागतिक महायुद्ध अपरिहार्य आहे, असे तो मानतो. त्याचा आंतरराष्ट्रिय सामंजस्यावर विश्वास नाही. तिसरे महायुद्ध झाल्याशिवाय क्रांतीला चालना देता येणार नाही, असे त्याचे मत आहे. चीनच्या जागतिक दृष्टिकोणाचा हा एक भाग झाला. चीनच्या शेजाऱ्यांबद्दलच्या दृष्टिकोणात खरोखरच बदल झाला आहे काय? मला तसे वाटत नाही. चीनला शेजाऱ्यांसंबंधी काय वाटते, याचा भारताने १९६२ मध्ये अनुभव घेतलेला आहे. व्हिएतनामने अलीकडे तो १९७९ मध्ये घेतला. यावरून चीनच्या मनोवृत्तीत काहीच फरक पडलेला नाही, हेच सिद्ध होते. माओ आणि चौ एन् लाय निधन पावले असतील, म्हणून काय झाले? त्यांची जागा तेंग आणि हुआ यांनी घेतली आहे. शेजाऱ्यांकडे पाहण्याच्या चीनच्या दृष्टिकोणात मुळीच बदल झालेला नाही. तो आहे तसाच आहे.

१९६२ मधील युद्धानंतर दुस-या एका देशाच्या मंत्र्यांशी बोलण्याचा योग आलेला होता. कोलंबो योजनेचा विचार करण्यासाठी भरलेल्या परिषदेमध्ये त्याने भाग घेतला होता. त्याने मला सांगितले, 'मी ज्यावेळी चीनला गेलेलो होतो, तेव्हा राष्ट्राध्यक्ष लिऊ शाओची मला म्हणाले, 'भारत जर अजूनही धडा शिकलेला नसेल, तर आम्ही त्याला वारंवार धडा शिकवू, हे तुम्ही तुमच्या भारतीय मित्रांना जाऊन सांगा'. याचा अर्थ असा, की चीन वारंवार भारतावर आक्रमण करील. चीन शेजाऱ्यांकडे कोणत्या दृष्टिकोणातून पाहतो, याचा हा एक पुरावा आहे. आपल्या लहानमोठ्या शेजाऱ्यांना धडा शिकविण्याची चीनची नीती आहे. चीन हा जगातील मध्यवर्ती देश असून सा-या जगाने आपले ऐकले पाहिजे, असे चिनी नेते मानतात. चीनची ही मन:प्रवृत्ती आपण कधीही विसरता कामा नये. ती लक्षात घेऊनच आपण त्याच्याबरोबरचे संबंध सुधारण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

   

मराठी पुस्तके  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१५ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .