TOP HEADER
   
 • 001_Krishnakath.jpg
 • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
 • 003_Shabdhanche.jpg
 • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
 • 005_Saheb_14.jpg
 • 006_Yashodhan_76.jpg
 • 007_Yashodharshan.jpg
 • 008_Yashwant-Chintanik.jpg
 • 009_Kartrutva.jpg
 • 010_Maulik-Vichar.jpg
 • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
 • 012_Sahyadricheware.jpg
 • 013_Runanubandh.jpg
 • 014_Bhumika.jpg
 • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
 • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
 • Debacle-to-Revival-1.jpg
 • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
 • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
 • sing_3.jpg
   
   

राष्ट्रीय प्रगतीचे तीन आधारस्तंभ

आपल्या देशाच्या स्वातंत्र्याच्या पंधराव्या वर्षाचा प्रारंभ आजच्या दिवसानें होतो. ऑगस्ट १५ ला आपल्या देशाच्या इतिहासांत जें वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे त्यामुळे हा दिवस नेहमींच आपल्या आठवणींत राहील. नि:शस्त्र असतांना सुद्धां आपण एका अत्यंत बलाढ्य व अभिमानी अशा साम्राज्याशी टक्कर दिली आणि त्या साम्राज्याकडून आपलें स्वातंत्र्य प्राप्त करून घेतले. ध्येयातील आपली निष्ठा, तत्त्वांवरील अविचल श्रद्धा, कधींहि न ढळणारें धैर्य आणि लढ्याचें अहिंसात्मक व शांततामय तंत्र यांमुळेंच आपण आपलें ध्येय गांठूं शकलो.

अशा प्रकारें, आपल्या लढ्यामध्ये अत्यंत चिकाटीने ज्या गुणांचा आपण परिपोष केला त्या गुणांनी आपल्याला आपल्या अडचणींच्या काळांत एखाद्या मार्गदर्शक ता-याप्रमाणे सदैव मार्गदर्शन केलें आहे. विशेषत: स्वातंत्र्योत्तर काळांतील अडचणींच्या प्रसंगी हे गुण आपल्या अतिशय कामी आले ही गोष्ट त्या काळांतील घटनांवरून पूर्णपणें सिद्ध झाली आहे.

यामागील घटनांचा आपण जेव्हां विचार करतों तेव्हा आपण एका महान् राष्ट्रांचे घटक आहोंत, आणि विशेषत: राष्ट्र या शब्दांत जो नैतिक व आध्यात्मिक अर्थ आहे त्या अर्थानें आपलें राष्ट्र अतिशय महान आहे ही गोष्ट आपल्यासमोर स्पष्ट उभी राहते. आपल्या या उज्ज्वल परंपरेला आपणांस पात्र ठरावयाचें असल्यास आपण आपलें मन विशाल केलें पाहिजे, अंत:करण खंबीर केले पाहिजे व या गुणांची सतत जोपासना केली पाहिजे. आपला देश भौतिक व आर्थिक अशा दोन्ही अर्थांनी सामर्थ्यवान बनविण्याचें जे प्रचंड कार्य आज आपण हाती घेतलें आहे त्यांत त्याचा आपल्याला फार उपयोग होणार आहे.

आपल्या राष्ट्रीय प्रगतीची भव्य इमारत आपल्याला लोकशाही, नियोजन व समाजवाद या तीन स्तंभांवर उभारावयाची आहे, याची आजच्या दिवशीं आपण आठवण ठेवणें समयोचित ठरेल. आपल्या देशासाठी आपण ज्या संसदीय लोकशाहीचा स्वीकार केलेला आहे, त्या लोकशाहीसाठी कर्तव्यनिष्ठा, सहकार्य व शिस्त या गुणांची फार मोठ्या प्रमाणांत आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे दुसरी आवश्यक गोष्ट म्हणजे आपल्या राष्ट्रीय जीवनाच्या सातत्यांत कोणत्याहि प्रकारचा खंड न पडू देतां त्यामध्ये क्रमाक्रमानें परिवर्तन घडवून आणणें ही होय. दुस-या शब्दांत सांगावयाचे म्हणजे आपल्याला जे सामाजिक बदल घडवून आणावयाचे आहेत ते आपल्या उज्ज्वल भूतकाळाशी सुसंबद्ध असे असले पाहिजेत. सातत्याखेरीज कोणत्याहि प्रकारचा बदल घडून आला तर तो राष्ट्राच्या उलथापालथीला व विनाशाला कारणीभूत होतो. उलटपक्षीं कोणताहि बदल न होता चालूं राहणारें सातत्य हे गतिरहित स्थितीला कारणीभूत होतें. अशा प्रकारच्या गतिरहित स्थितीपासून राष्ट्र या नात्याने आपण आपलें संरक्षण केलें पाहिजे. बदल व सातत्य या प्रक्रियांमध्ये समतोल राखण्यासाठी आपण जी उपाययोजना करू त्यावरून आपल्या देशाची एकता, सामर्थ्य व स्थैर्य यांची आपल्याला प्रचीति येणार आहे. शांततामय पद्धतीचा स्वीकार हें सुद्धा लोकशाही पद्धतीचें आणखी एक आवश्यक असें वैशिष्ट्य असून आपल्या प्रत्येक कृतीमध्ये व हालचालीमध्ये हें वैशिष्ट्य प्रतिबिंबित झालें तरच आपण लोकशाही राष्ट्र या संज्ञेला पात्र आहोंत असे सिद्ध होईल.

   

मराठी पुस्तके  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१५ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .