TOP HEADER
   
 • 001_Krishnakath.jpg
 • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
 • 003_Shabdhanche.jpg
 • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
 • 005_Saheb_14.jpg
 • 006_Yashodhan_76.jpg
 • 007_Yashodharshan.jpg
 • 008_Yashwant-Chintanik.jpg
 • 009_Kartrutva.jpg
 • 010_Maulik-Vichar.jpg
 • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
 • 012_Sahyadricheware.jpg
 • 013_Runanubandh.jpg
 • 014_Bhumika.jpg
 • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
 • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
 • Debacle-to-Revival-1.jpg
 • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
 • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
 • sing_3.jpg
   
   

सध्यां हिंदी भाषा एका मोठ्या संक्रमणावस्थेंतून जात आहे. यापूर्वी हिंदी साहित्याच्या इतिहासांत अशा प्रकारच्या संक्रमणावस्थेचा काळ कधीं आला नसेल. दुस-या प्रांतिक भाषांशी तुलना करतां हिंदी भाषा बोलणारे लोक देशाच्या निरनिराळ्या भागांत अधिक प्रमाणांत असल्यामुळें या भाषेला राष्ट्रभाषा बनण्याचा बहुमान प्राप्त झाला आहे. तथापि या थोर मानाची जिम्मेदारी चांगल्या प्रकारें पार पाडण्याचें काम विशेषतः हिंदी साहित्यिकांचें आहे. आज देशाच्या कानाकोप-यांतून हिंदी भाषेचा प्रसार करण्याची आवश्यकता तर आहेच; परंतु त्याहिपेक्षा हिंदी भाषेंतील शब्दसंपत्ति आज अशा प्रकारें वाढविली पाहिजे कीं, ज्यामुळें आधुनिक विचारप्रवाह, शास्त्रीय व तांत्रिक विषय, आणि त्याचप्रमाणें राज्यकारभार यांची संपूर्ण गरज ती चांगल्या प्रकारें भागवूं शकेल. या दिशेनें केंद्रीय सरकारतर्फे उच्च पातळीवर बरेंच कार्य चालू आहे. तथापि हें महान् कार्य त्वरित पूर्ण होण्यासाठीं सर्वच हिंदी साहित्यिकांच्या हार्दिक सहकार्याची विशेष आवश्यकता आहे.

इतर प्रांतिक भाषांशी हिंदी भाषेचें अधिक प्रमाणात साहचर्य व्हावयास पाहिजे. तसें झाल्यास सगळ्या प्रांतिक भाषांबरोबरच हिंदीचीहि ख-या अर्थानें प्रगति होऊं शकेल. प्रांतिक भाषांतील चांगल्या व मौलिक साहित्याचा हिंदी भाषेंत अनुवाद व्हावयास पाहिजे, आणि त्याचप्रमाणें हिंदी भाषेंतील मौलिक साहित्याचाहि प्रांतिक भाषांतून अनुवाद झाला पाहिजे. साहित्याच्या या देवाणघेवाणीबरोबरच शब्दसंपत्तीचीहि देवाणघेवाण झाल्यास परस्परांमधील जिव्हाळा वाढविण्याच्या दृष्टीनें बरीच मदत होईल. जितक्या अधिक प्रमाणांत प्रांतिक भाषांतील शब्द हिंदी भाषेंत रूढ होतील तितकी हिंदी भाषा त्या त्या प्रांतातून अधिक सहजगत्या समजूं शकेल. त्याचप्रमाणें हिंदींतील शब्द व वाक्प्रचार यांचा इतर प्रांतिक भाषांतून अधिक प्रमाणांत समावेश झाल्यास त्या त्या भागांतील लोकांना हिंदी शिकणें अधिक सोपें जाईल. संस्कृत भाषेचा फार मोठा प्रभाव हिंदीसहित सर्व प्रांतिक भाषांवर पडला आहे. त्यामुळें चांगल्या संस्कृत कलाकृतींचा हिंदी अनुवाद देशांत सर्वत्र लोकप्रिय होऊं शकेल. इंग्रजी, फ्रेंच, जर्मन वगैरे प्रमुख परदेशी भाषांमध्यें फार मोठें ज्ञानभंडार भरलेलें असून त्या भाषांतील निवडक ग्रंथांचा संक्षिप्त रूपानें हिंदींत अनुवाद झाल्यास हिंदी साहित्य अधिक संपन्न होऊं शकेल. अशा प्रकारच्या अनुवादित साहित्याबरोबरच नवीन विचारप्रवाहास स्फूर्ति देणा-या मौलिक साहित्याचीहि हिंदी भाषेंत निर्मिति होणें आवश्यक आहे. अशा नवीन साहित्यांत पौर्वात्य संस्कृतीचें चांगलें दर्शन तर घडलें पाहिजेच, पण त्याचबरोबर पाश्चिमात्य जीवनांतील चांगल्या गोष्टींसंबंधींचेंहि ज्ञान त्यांत असलें पाहिजे. विज्ञानाच्या प्रगतीबरोबरच जीवनमूल्यांतहि आश्चर्यकारक असे बदल होत असून त्यांचें यथोचित मूल्यमापन नव्या हिंदी साहित्यांत होणें आवश्यक आहे. त्याचप्रमाणें नवीन हिंदी साहित्यिकांना योग्यतेनुसार प्रोत्साहन मिळालें पाहिजे आणि त्यांच्या कलाकृति सुलभ रीत्या प्रकाशित होण्याच्या दृष्टीनें त्यांना आवश्यक त्या सोयी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत.

सामान्य लोकांना हिंदी भाषा समजण्यास अडचण पडूं नये म्हणून ही भाषा शक्य तितकी सरळ व सोपी ठेवण्याचे जाणूनबुजून प्रयत्न झाले पाहिजेत. साहित्यिक हिंदीमध्यें संस्कृत आणि इतर शब्दप्रयोगांचा वापर होणें कांहीं अंशी अपरिहार्य असलें, तरी हा वापर शक्य तो मर्यादित ठेवणें हिंदी भाषेच्या भावी प्रगतीच्या दृष्टीनें उचित होईल. खडी बोलीसारख्या हिंदीच्या बोलभाषेंतून सर्वसाधारण लोकांस समजण्यास कठीण अशा संस्कृत शब्दांचा उपयोग अजिबात टाळतां येणें शक्य आहे. भारतामध्यें भौगोलिक विविधता असून सुद्धां अनादि काळापासून आश्चर्यकारक सांस्कृतिक ऐक्य अस्तित्वांत आहे. परंतु पारतंत्र्याच्या काळांत आपापसांतील मतभेद वाढले आणि धर्म, जाति, भाषा, प्रान्तीयता वगैरे निरनिराळ्या कारणांमुळें आमच्यांत असलेली फूट वाढवून परकीय सत्तेनें आम्हांला गुलामगिरीच्या शृंखलांत जखडून ठेवलें. परंतु स्वातंत्र्याच्या आंदोलनांतून आमच्या राष्ट्रीय ऐक्याचें खरें स्वरूप प्रखरपणें प्रकट झालें. तथापि स्वातंत्र्यप्राप्तीनंतर कांहीं ठिकाणीं संकुचित स्वार्थामुळें मतभेद तीव्र होत गेले. ब-याच कालावधीनंतर आपल्या देशास संपूर्ण स्वातंत्र्य मिळालें आहे. पण राष्ट्रीय ऐक्य कायम टिकविण्यांत आपण अयशस्वी झालों तर आपलें स्वातंत्र्य धोक्यांत आल्याशिवाय राहणार नाहीं. इतिहासांत प्रथमच आपला संपूर्ण देश जनतेनें चालविलेल्या शासनाखालीं प्रजासत्ताक बनला आहे. तेव्हां त्याचा गौरव वाढावा म्हणून देशांतील निरनिराळ्या लोकामध्यें संपूर्ण ऐक्याची भावना असणें अत्यंत आवश्यक आहे. आपले मतभेद समजुतीनें मिटवून अभेद्य अशा एकजुटीच्या भावनेनें आपण राष्ट्रीय विकास कार्याला वाहून घेतलें पाहिजे. हिंदी भाषा ही राष्ट्रीय ऐक्याची वाढ करणारी एक फार मोठी शक्ति आहे. आणि म्हणून हिंदीच्या प्रगतीबरोबरच देशाच्या एकतेंतहि वाढ होत जाईल.

   

मराठी पुस्तके  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१५ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .