TOP HEADER
   
 • 001_Krishnakath.jpg
 • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
 • 003_Shabdhanche.jpg
 • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
 • 005_Saheb_14.jpg
 • 006_Yashodhan_76.jpg
 • 007_Yashodharshan.jpg
 • 008_Yashwant-Chintanik.jpg
 • 009_Kartrutva.jpg
 • 010_Maulik-Vichar.jpg
 • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
 • 012_Sahyadricheware.jpg
 • 013_Runanubandh.jpg
 • 014_Bhumika.jpg
 • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
 • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
 • Debacle-to-Revival-1.jpg
 • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
 • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
 • sing_3.jpg
   
   

सुप्रिया, ते दिवसच मंतरलेले होते.  नुकतंच स्वातंत्र्य मिळालं व्हतं.  ही गर्दी जमलेली, अख्ख्या पंचक्रोशीतनं माणसं आली व्हती.  चावडीम्होरं पाय ठिवायला जागा नव्हती.  आमी स्टेजम्होरं जागा धरलीती.  रेटारेटी, पोरांची घुसळण चालूच व्हती.  आन् हलगीवर थाप पडली.  वीज कडाडावी तशी हलगी बोलू लागली.  सारी माणसं चित्रावाणी गपचिप.  एकएक कवन आंगावर काटा आणीत व्हतं.  शाहीर जंगमस्वामी तेवढे आले होते.  बाकीची नामवंत मंडळी आली नव्हती.  जंगमस्वामींच्या कलापथकानं दांडगी रंगत आणलीती.  शाहीर खडखडीत आवाजात पक्षाचा प्रचार करणारी गाणी म्हणत व्हते.  लोक टाळ्यांवर टाळ्यांचा कडकडाट करीत व्हते.  शाहीर सादर करत होते, 'आम्ही काँग्रेसला मत कां द्यायचं, आन् बैलोबा म्हणून घ्यायचं ?'  अत्यंत तालासुरात, खड्या आवाजात शाहीर गाणं म्हणत व्हते.  त्यांची गाणी आता व्यक्तीवर घसरायला लागली.  यशवंतरावांवर ते 'अपीशा यशा' म्हणाले.  अपयशवंत उपदेश म्हणाले.  यशवंतरावांवर व्यक्तिगत टीका होऊ लागली, तशी सभेतली काही मंडळी बिथरली, काहींनी आधीच तयारी केली व्हती.  कालवा सुरू झाला.  सगळ्या कार्यक्रमांत अतिउत्साही लोकही असतातच की.  काही चेकाळले; तर काही चवताळले.  शाहीरांना आणखीनच चेव आला.  डफ, तुणतुणं टिपीला गेलं.  'यशवंताला आवदसा दिसली', शाहीर म्हणाले.  झीलकरी म्हणाले, 'आरं पर ती कशी हासली ?  यशवंतरावांच्या बोडकीवाणी हासली.'

'बोडकीवाणी म्हंजी.'

'आरं आमची मुंबई ह्यो चोर गुजराथ्यासनी द्यायला उठलाय.  ह्या चोराला का म्हण द्यायची.  आन् आमी बैलोबा म्हणून घ्यायची.'  डफाचा ठेका नेमका समवर आणीत शाहीर कवन गात होता.  'झाली मुंबई आमची तुमची, मग यशवंतराव भांडी घासा तुमी गुजराथ्यांची.  आमी मुंबई मिळवणार, आन् मंडळी यशवंतराव मुरारजींची... धुणार.  आरं मुंबई घेतल्याबिगार आता थांबणार नाही.  डांग सोडणार न्हाय.  बात मराठी मुलखाचल, सार्‍यांच्या ऐक्याची, आन् समदीजण जिरवू यशाची.  हानु हातुड्याचा घाव, आमचा भलताच भाव, आमी मुंबईच्या गादीवर बसणार.  यसबा, तुमी कराडच्या मसणवट्यात रडणार.'

यशवंतराव, त्यांच्या कुटुंबीयांची, काँग्रेस सार्‍यांचा खुर्दा शाहीर करत होता.  जवाहरलाल नेहरूंची टर उडवीत होता.  एका बाजूला शाहीराच्या डफाच्या ठेक्याला टाळी पडत होती.  तर दुसरीकडं गेणु सस्ता उठला, 'ये तुझ्या आईच.... कुणाला चोर म्हणतुयास रं.'  शिव्यांची लाखोली सुरू झाली.  त्याला बावटावाल्यांनी आडवला, तसं वरच्या आळीच्या पोरांनी मुसांडी मारली आन् स्टेजकडं पळाले.  मग पाटलाच्या वाड्यांतल्या पोरांनी काठ्या काढल्या.  आम्ही पार घाबरलो.  पळायला तर जागाच नव्हती.  आपण आता या गर्दीत चेंगरणार, मरणार, म्हणून आम्ही बारकी पोरं उंदीर बिळांत घुसावा तसं स्टेजच्या खाली लपलो.  जीव भांड्यात पडला.  मोठ्या माणसांस्नी घुसता येत नव्हतं.  वर मारामारी सुरू होती.  काठी, लाठी कुर्‍हाडी, दगडांचा वर्षाव झाला.  अनेकांची टकुरी फुटली, अनेकजण जायबंदी झाले.  कुणाचा हात मोडला, कुणाचा पाय मोडला, दंगल आता गावभर पसारली.  गणू सस्ता म्हंजी पैलवान माणूस.  डोस्क्याचं मुंडासं त्यानं गर्दीत उधाळलं.  त्याला वाटलं, टकुर्‍यातच कुणीतरी हानलं.  आन् मंग काय, उचल की आपट सुरू झालं.  शाहीर सामान घिऊन चावडी मागं पळाला.  त्याज्या मागं पोरं पळाली.  कोण कुणाला धरतोय.  कोण कुणाला मारतोय.  'यशवंतरावासारख्याला ह्यो भाड्या आमच्या गावांत इऊन चोर म्हणतुया.  आरं काय बगताया काय ?'  मानसिंग सस्ता म्हणला.  तसं गणपत पाटील म्होरं सरला, त्यानं नरसिंग मास्तरला आडवा केला.  ते बिचारे जरा चोचरं बोलायचे.  त्यांचं खादीचं धोतार फाटलं, टोपी उधाळली.  आंगातल्या नेहरू शर्टाच्या चिंध्या झाल्या.  ते काय म्हणत होते, कुणास कळत नव्हतं.  पण, मोठ्यामोठ्यानं तावातावानं बोलतं व्हते.  तेवढ्यात कुणीतरी रामभाऊच्या डोस्क्यात काठी हानली.  आन् मग जी तुंबळ माजली, ती इचारू नको.  आतापर्यंत गप आसलेल्या म्हारामांगाची, रामुशाची पोरं उतारली आत, आन् सारं गाव पेटतंया का म्हणून ज्यो त्यो जीव मुठीत घिऊन पळाय लागला.  आमी आत गप, जीव मुठीत धरून रडत, बोंबलत व्हतो.  पण कुणाचं आमच्याकडं ध्यानच नव्हतं.  म्होरल्या दंग्यात हाक ना बोंब.  कोण बघतंया का म्हणून आमी कासावीस.  तेवढ्यात माझा बाप मला शोधीत म्होरनं गेला.  त्याला आमी कसं दिसणार ?  आमी तर खाली होतो स्टेजच्या !  कुणी म्हणत व्हतं, सासकलकरांनी दंगल केली.  कुणी म्हणं, गिरवीकरांनी दंगल केली.  गावातले लोक जखमी झाले होते.  थोड्या वेळात पोलिसांच्या गाड्या आल्या.  गर्दीतनं वाट काढत माझे वडील मला शोधतच व्हते.  मी त्यांना सापडत नव्हतो.  पोलिसांनी जसा तिथं ताबा घेतला, तशी सारी गर्दी पशार झाली.  काँग्रेसचे मानसिंगराव, नरसिंग गुरुजी, वरची आळी, मधली आळी यातले पुढारी जखमी झाले व्हते.  लाल बावटावालेही प्रमुख कार्यकर्ते जखमी झाले व्हत.  सार्‍या कीर्तनाचा बगता बगता तमाशा झाला होता.  सारं गाव आता पोलीस काय करणार, या भीतीनं गांगरून गेलं व्हतं.  दवाखान्यात पोलिस जखमींना घेऊन गेले. गांव शांत झालं.  सारी माणसं घराघरात शाहीराचंच चुकलंय, त्या लयच घसारला म्हणती व्हती.  कायबाय म्हणत व्हती.  यशवंतराव म्हंजी स्वातंत्र्य चळवळीचं नाक.  त्यांना कशापाय वंगाळसंगाळ बोलायचं ?  एकजण म्हणत व्होता, 'आरं कुठं इंद्राचा ऐरावत आन् कुठं शामभट्टाची तट्टानी ? यशवंतराव ते यशवंतरावच.'

ती. बाबांना, सौ. वहिनींना सप्रेम नमस्कार.

तुझा,
लक्ष्मणकाका

   

मराठी पुस्तके  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१५ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .