TOP HEADER
   
 • 001_Krishnakath.jpg
 • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
 • 003_Shabdhanche.jpg
 • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
 • 005_Saheb_14.jpg
 • 006_Yashodhan_76.jpg
 • 007_Yashodharshan.jpg
 • 008_Yashwant-Chintanik.jpg
 • 009_Kartrutva.jpg
 • 010_Maulik-Vichar.jpg
 • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
 • 012_Sahyadricheware.jpg
 • 013_Runanubandh.jpg
 • 014_Bhumika.jpg
 • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
 • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
 • Debacle-to-Revival-1.jpg
 • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
 • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
 • sing_3.jpg
   
   

राजकीय जीवनाचे तोरण

वयाच्या सतराव्या वर्षी यशवंता राष्ट्रीय चळवळीत सामील झाला. प्रबोधन, लोकजागृती करू लागला. सरकारविरोधी कार्यक्रमात सहभागी होऊ लागला. त्यावेळी त्याचे वय कमी असले तरी वयाच्या मानाने त्याची समज खूपच जास्त होती. त्याची विचारपद्धती निर्णयक्षमता आणि राजकीय आकलनाविषयी त्याच्या सहका-यांना पूर्ण खात्री होती. त्याच्या शब्दाला मान होता. अशातच १९३७ साली असेंब्लीच्या निवडणुका जाहीर झाल्या. राष्ट्रीय सभेने ही निवडणूक लढवायचे ठरवले. कराड मतदारसंघातून कोणाला उमेदवारी द्यावी यावरून वाद निर्माण झाला. उमेदवार हा सुशिक्षित आणि स्वातंत्र्यलढ्यात प्रत्यक्ष सहभाग घेतलेला असावा असे यशवंताचे व त्याच्या सहका-यांचे म्हणणे होते. त्या दृष्टीने आत्माराम पाटलांचे नाव त्यांनी सुचविले. पण जिल्हा काँग्रेसच्या प्रस्थापित नेत्यांचा या नावाला विरोध होता. तिकिटवाटपाचा अधिकार त्यांनाच असल्याने अर्थातच आत्मारामबापूंना तिकिट मिळाले नाही. पण यशवंता व त्याचे सहकारी डगमगले नाहीत. सहका-यांच्या वतीने प्रदेशाध्यक्षांशी चर्चा करण्यासाठी यशवंता पुण्याला गेला. शंकरराव देव आणि केशवराव जेधेंची त्याने भेट घेतली. त्यांना कार्यकर्त्यांची इच्छा सांगितली. जेमतेम चोवीस वर्षांचा हा तरूण जिल्ह्यातील प्रस्थापित नेत्यांच्या विरोधात राज्यपातळीवरील नेत्यांना एकटाच भेटायला जातो ही एक अपूर्व घटना होती. जेधे आणि देवांनी यशवंताला अपेक्षित असलेला निर्णय दिला नाही. उदास मनाने यशवंता साता-याला परत आला. पण कार्यकर्ते स्वस्थ बसायला तयार नव्हते. ते म्हणाले, ' यशवंता, तू मुंबईला जाऊन सरदार पटेलांना का भेटत नाहीस ?'

यशवंताही जिद्दीला पेटला होता. तो म्हणाला,

' प्रवासभाड्यासाठी पैसे द्या. मी मुंबईला जातो.'

अखेर कार्यकर्त्यांनी वर्गणी गोळा केली आणि यशवंता एकटाच मुंबईला गेला. सरदार पटेल तेव्हा मुंबईत त्यांच्या मुलाच्या घरी रहात होते. यशवंता त्यांच्या घरी गेला आणि भेटीसाठी चिठ्ठी आत पाठवली. बराच वेळ झाला तरी आतून बोलावणे येईना. सरदार पटेल हे उग्र प्रकृतीचे नेते होते. ते काय म्हणतील ही धास्ती होतीच. शेवटी पटेलांनी यशवंताला आत बोलावले. यशवंताने स्वत:ची ओळख करून दिली. ' का आला आहात ?' सरदारांनी विचारले.

" असेंब्लीच्या निवडणुकीसाठी सुशिक्षित आणि स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतलेल्या व्यक्तीला उमेदवारी मिळावी अशी आम्हा सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे. आत्माराम पाटील हे शेतकरी कुटुंबातील आहेत आणि त्यांच्या उमेदवारीने ग्रामीण भागात चांगला संदेश जाईल असे आम्हाला वाटते."

सरदारांनी यशवंताचे म्हणणे ऐकून घेतले व मिश्किलपणे म्हणाले, " पण तुमचा हा शेतक-यांचा उमेदवार पडला तर त्याची जबाबदारी कोण घेणार ?"

" आम्ही सर्व कार्यकर्ते ती जबाबदारी घेऊ  !" यशवंता आत्मविश्वासाने म्हणाला, भेट संपली. सरदारांनी ' हो ' किंवा 'नाही ' असा निर्णय दिला नाही. यशवंता साता-याला परत आला. त्यानंतर चारच दिवसांनी आत्मारामबापूंना उमेदवारी मिळाल्याचे जाहीर झाले. यशवंताच्या मुत्सद्देगिरीचा हा पहिला विजय होता. कार्यकर्त्यांनी प्रचाराला वाहून घेतले आणि त्या निवडणुकीत आत्मारामबापू सर्वाधिक मतांनी निवडून आले. यशवंताच्या राजकीय जीवनाचे तोरण बांधले गेले  !

   

मराठी पुस्तके  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१५ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .